
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते भिवंडी हा अखेरचा टप्पा 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उद्घाटनाची लगीनघाई सुरू असली तरी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र सरकारने फुटकी कवडीही दिली नाही. शेतकऱ्यांचा हक्काचा मोबदला लटकवून महामार्गाचे उद्घाटन करू पाहणाऱ्या सरकारविरोधात प्रचंड संताप असून 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.
सरकारने घोर फसवणूक केली
तालुक्यातील वाशाळा, फुगाळे, कसारा बु, शेलवली या गावांतील बाधित ग्रामस्थांचे वनहक्क दावे मंजूर असून त्यातील काही शेतकऱ्यांकडे सनददेखील आहे. तरीसुद्धा गेल्या सात वर्षांपासून आदिवासी कुटुंबांना हक्काच्या पैशांसाठी शासनाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. मोबदला मिळावा यासाठी गुरुवारपासून शेतकऱ्यांनी फुगाळा बोगदा येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महायुती सरकारने गरीबांची घोर फसवणूक केल्याचा आरोप फुगाळे येथील शेतकरी एकनाथ भला यांनी केला आहे.
- समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते भिवंडी या 75 किलोमीटर कामाला सर्वात जास्त कालावधी लागला. समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध करत जनआंदोलन केले. पहिल्या दिवसापासून जमिनीच्या खरेदी -विक्रीमध्ये सावळागोंधळ होता. तो शेवटपर्यंत कायम राहिला.
- अधिकारी आणि दलालांनी शेतकऱ्यांना फसवून जमिनी ताब्यात घेतल्या. शेतकऱ्यांना नाममात्र किंमत देऊन अधिकारी, दलाल गब्बर झाले. फसवणुकीचा फटका आदिवासी, कातकरी, दलित समाजातील शेतकऱ्यांना बसला.
- शहापूर तालुका हा पेसामध्ये मोडत असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गात अनेक आदिवासी कुटुंबांच्या शेतजमिनी बाधित झाल्या. मात्र अनेक कुटुंबांना अजूनही मोबदला मिळाला नाही.
- 1 मे रोजी इगतपुरी ते भिवंडी या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यापूर्वी भूसंपादनाचा मोबदला मिळावा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.