Assembly Election 2024 –नावात काय नसतं…?

 

नावात काय आहे, असे शेक्सपियरने म्हटले असले तरी नावात बरेच काही असते, याचा प्रत्यय राज्यातील विधानसभा निवडणुकीत आला आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. परंतु, त्याआधीच एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. मतांची गोळाबेरीज, पाडापाडी आणि मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी सारखे नाव असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. परंतु, या ठिकाणी दोन अश्विनी कदम नावाच्या महिलांनी अर्ज भरला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. याठिकाणी रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे अशा नावाच्या दोन अपक्ष महिलांनी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे या महिला या मतदारसंघातील नाहीत.

तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील उमेदवार आहेत. या ठिकाणी रोहित पाटील नावाच्या तीन जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

वाळवा-इस्लापूर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील उमेदवार आहेत. तर या ठिकाणी जयंत पाटील या नावाच्या दोन जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.