निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे चारकोपमध्ये राहणाऱया एकाच नावाच्या दोन मतदारांना फटका बसतोय. एकाने मतदान केले की, त्याच नावाच्या दुसऱया व्यक्तीला मतदानापासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तक्रार करूनही निवडणूक आयोग दखल घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
चारकोप येथील सह्याद्री नगर आणि गणेश मंदिर येथे संजय शामराव कांबळे या एकाच नावाच्या दोन व्यक्ती राहतात. या दोन्ही व्यक्तींचे मतदान केंद्र चारकोप सेक्टर-2 येथील मनपा अप्पर प्रायमरी मराठी शाळा या एकाच ठिकाणी येते. दोघांपैकी एकाने अगोदर जाऊन मतदान केले, तर निवडणूक अधिकाऱयांकडे असलेल्या यादीत नावापुढे टीक असल्याने दुसऱयाला मतदान करता येत नाही.
याबद्दल आपली नाराजी व्यक्त करताना चारकोप सेक्टर-2 गणेश मंदिर येथे राहणारे संजय शामराव कांबळे म्हणाले, एखादा मतदार मतदान करायला जातो तेव्हा मतदान केंद्रातील निवडणूक अधिकारी त्याचा चेहरा आणि ओळखपत्र हे पुरावे तपासूनच त्याला मतदानासाठी परवानगी देतात. आमचे पूर्ण नाव सेम असले तरी आमचा चेहरा, घरचा पत्ता, निवडणूक कार्डचा क्रमांक या गोष्टी भिन्न आहेत. केवळ आमचे नाव न बघता इतर पुराव्यांचीदेखील व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे. सेम नावामुळे झालेल्या गोंधळामुळे मला 2019 ची लोकसभा, विधानसभा आणि 2024 ची लोकसभा या तिन्ही वेळेस मला मतदान करता आले नाही. तुम्ही आधीच मतदान केले आहे असे उत्तर मला मिळाले. योगायोगाने आज मी लवकर आलो, त्यामुळे मला मतदान करता आले असेही त्यांनी सांगितले.