
पोलिसांनी संभलच्या जामा मशिदीचे प्रमुख जफर अली यांना आज सकाळी 11 वाजता ताब्यात घेतले. विशेष तपास पथकाने त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. पोलिसांच्या गाडीतून जाताना त्यांच्या समर्थकांनी पोलीस आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकजण पोलिसांच्या गाडीमागे धावतानाही दिसले.
शाही जामा मशीद समितीचे प्रमुख जफर अली यांना त्यांच्या मुलासोबत 24 नोव्हेंबरच्या हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी संभल पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर कोतवाली येथून चंदौसी न्यायालयात नेण्यात आले. याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. संभल हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी जफर अली यांना आधी कोतवाली येथे नेण्यात आले. दरम्यान, संभलमध्ये पुन्हा हिंसाचार घडू नये यासाठी कोतवाली येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संभलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. उद्या सोमवारी जफर अली यांचा न्यायिक तपास आयोग जबाब नोंदवून घेणार आहे.
संभल हिंसाचारप्रकरणी जबाब नोंदवले
संभल हिंसाचार प्रकरणी न्यायिक आयोगाचे पथक दोन दिवसांसाठी संभल येथे आले होते. पहिल्या दिवशी 29 तर दुसऱया दिवशी जवळपास 15 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. याप्रकरणी डीएम आणि एसडीएम तसेच एडीएम यांचाही जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी 124 आरोपींविरोधात एकूण 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 12 एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यात एकूण 2 हजार 750 जणांना आरोपी करण्यात आले आहे.