समाजवादी पक्षाकडून संभल हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; भाजपवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचाराने देशातील आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेशातील विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते माता प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सपाच्या शिष्टमंडळाने संभलमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना धनादेश सुपूर्द केला.यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

माता प्रसाद पांडे म्हणाले की, आम्हाला संभलमध्ये यापूर्वीच यायचे होते, पण आम्हाला प्रशासनाने येऊ दिले नाही. पोलिसांनी सपाचे खासदार जिया उर रहमान बुर्के यांच्याविरुद्ध संभल हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खासदार झिया उर रहमान यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले पूर्णपणे चुकीचे आहेत. तसेच संभलमध्ये झालेल्या हिसंचारात पोलिसांच्या गोळीमुळेच या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांनी भाजपवर आरोप केले.

संभलच्या शाही जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले. 24 नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण पथक मशिदीच्या आत असताना मशिदीबाहेर हिंसाचार झाला. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, गोळीबार केला आणि वाहनेही जाळली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू झाला. या पीडित कुटंबीयांना सपाने प्रत्येकी 5 लाखांची मदत केली आहे.