‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. हत्या होऊन महिना उलटला, तरी सर्व आरोपी पकडले गेले नाहीत. त्यामुळे साहजिकच पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? अशी शंका येते. जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे,’ असे स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. दरम्यान, ‘देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते हे दुर्दैव आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने बीडमधील असंतोषाचे कारण मंत्री मुंडे ठरत आहेत. मंत्री मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे, की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का?’ असा सवाल करत, ‘देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये,’ असे संभाजीराजे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत, मग पोलीस ते व्हिडीओ जनतेसमोर का आणत नाहीत? असे अनेक सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी नेमलेल्या ‘एसआयटी’त वाल्मी क कराडसोबत संबंध असलेले अधिकारी मंत्री मुंडे निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. शिवाय बीडमधील लहान मुलांपासून सर्वांना या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे, तर मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे? महाराष्ट्रात दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत असून, या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिले पाऊल उचलावे, अशी अपेक्षाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
याप्रकरणी अनेकांना धमकी आली आहे; पण मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही. जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलेच तर पुढे बघू, असा सूचक इशाराही संभाजीराजे यांनी दिला.