बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींचा वाल्मीक कराड हा म्होरक्या आहे. तो शरण आल्याने विषय संपत नाही. त्याला ‘मोक्का’ लावला गेलाच पाहीजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. वाल्मीक कराडच्या नावे 14 गुन्हे आहेत, तरीही बॉडीगार्ड घेऊन हा कसा फिरतो. त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा सवालही संभाजीराजे यांनी केला.
वाल्मीक कराड शरण आला म्हणजे विषय संपला असा अर्थ होत नाही. उलट आता सरकारची जबाबदारी वाढली आहे. सीडीआर तपासला गेला पाहिजे. खंडणीच्या गुह्यात त्याला अटक केली आणि तो उद्या जामीन घेऊन बाहेर येईल हे काही आम्ही शांतपणे पाहणार नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन खाली खेचणं, तसंच पालकमंत्रिपद तर मुळीच न देणं यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे. तसंच अजित पवार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही का बोलले नाहीत? तुम्ही धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात, असं संभाजीराजे म्हणाले.