ब्राह्मणवाद प्रभावी ठरला की हुकूमशाहीकडे वाटचाल होते, फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प राजू परुळेकर यांनी गुंफले

बहुजन विचारधारा म्हणजे ‘माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवावे’ ही आहे, परंतु अलीकडच्या काळात असे होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हा पुरोगामी की काही पुरोगामी महामानव असलेले राज्य आहे ? हा चिंतनाचा विषय झाला आहे. बहुजनवादाने लोकशाही अवतरते आणि ब्राह्मणवाद प्रभावी ठरला की हुकूमशाहीकडे वाटचाल होते. दुर्दैवाने आज बहुजन समाजाचे ब्राह्मणीकरण होत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात पत्रकार, विचारवंत राजू परूळेकर यांनी केले.

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना परुळेकर बोलत होते. ‘बहुजनांचे सांस्कृतिक व राजकीय भान’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन हे होते. व्यासपीठावर पंडितराव हर्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना परुळेकर म्हणाले, साताऱ्यात बहुजनांचे नायक डॉ. आ. ह. साळुंखे असताना बहुजनांची मुलं चुकीच्या मार्गाला लागली आहेत. हा बहुजन विचारधारेचा अपमान नाही का?

बहुजन ब्राम्हणवादी होत आहेत. कारण त्यांच्या प्रमुखांना आपल्या जहागिऱ्या वाचवायच्या आहेत. हे पूर्वापार सुरू आहे. अपवाद शिवरायांचा काळ आहे. कारण हे सर्व शिवरायांनी मोडून काढले. पुरोगामी विचारांच्या लोकांना ट्रोल करणाऱ्यांची यादी पहा. सर्व बहुजन दिसतील. कारण ब्राम्हण या मागचे सूत्रधार असतात. आर.एस.एस. ला फक्त ‘हे राम’ माहिती आहे. ते गांधींच्या हत्येला ‘वध’ म्हणतात. ‘नो बिंदी नो बिझनेस’ हा आर.एस.एस. चा फंडा आहे. आपणही टिळा लावायला सुरुवात केली. शिवरायांचा पराक्रम नाकारणाऱ्यांची जयंती बहुजन करत आहेत.

वल्लभभाई पटेलांनी आर.एस.एस. वर घातलेली बंदी लोकशाहीच्या नावाखाली नेहरूंनी उठवली नसती तर आजचे आर.एस.एस. चे हे रूप आपणास पाहावयास मिळाले नसते. ‘माणूस मरतो, विचार संपत नसतात’ असे म्हणतात. पण, आर.एस.एस. ने हे सिद्ध केले की, ‘माणूस मारला की त्याचा विचारही संपतो’. दाभोळकर मारले. त्यांची चळवळ थांबली. महाविकास आघाडी सरकार असताना डॉ. आ.ह. साळुंखे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या, अशी मागणी होती, नाही दिला. महायुतीचे सरकार आल्यावर हा पुरस्कार कोणाला दिला? समजून घ्या, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी केले. याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले, साहित्यिक वासुदेव मुलाटे, विजय पाथ्रीकर, शाहू पाटोळे, राजेश करपे, डॉ. राम चव्हाण, अशोकराव जगताप, त्रिंबक पाथ्रीकर, डॉ. संजय शिंदे, श्रीराम जाधव, चंद्रकांत चव्हाण, डॉ. गणी पटेल, विजय राऊत, उपप्राचार्य रवी पाटील, डॉ. अपर्णा तावरे, प्रा. नंदकुमार गायकवाड यांच्यासह शहरातील सामाजिक व राजकीय चळवळीतील सर्व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समन्वयक तथा उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांनी केले.