शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतविलेले 39 लाख रुपये हडपले, अभ्यासिका चालकाची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एका अभ्यासिका चालकाला अबॉट वेल्थ मॅनेजमेंट लि. या कंपनीच्या लिंकद्वारे 39 लाख रुपयांचा चुना लावला. हा प्रकार 24 जुलै 2024 ते 18 सप्टेंबर 2024 दरम्यान घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जयंत रामराजे खडके (58, रा. कुंभारवाडा) हे संभाजीपेठेत अभ्यासिका चालवतात. 15 जुलै 2024 रोजी त्यांच्या फेसबुकवर ‘अबॉट वेल्थ’ या शेअर ट्रेडिंग कंपनीबाबत माहिती मिळाली. या कंपनीच्या लोकांनी जयंत खडके यांना एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. त्यावर खडके यांनी पैसे कसे गुंतवायचे, गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा किती, याबाबत माहिती दिली. त्यामुळे खडके यांचा भामट्यांवर विश्वास बसला. 24 जुलै 2024 रोजी खडके यांनी 25 हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना अबॉट वेल्थ मॅनेजमेंट लि. वर लिंक मिळाली. त्या लिंकवरून त्यांनी अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर खडके यांना 8 लाख 92 हजार 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यानंतर गुंतवलेल्या रकमेवरील काही रक्कम परत करण्यासाठी खडके यांनी विनंती केली असता भामट्यांनी
त्यांना 3 लाख 98 हजार 28 रुपये परत केले होते.

आपण गुंतविलेल्या पैशावर रक्कम मिळाल्याने खडके यांचा विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी म्युच्युअल फंड तोडून त्यातील 20 ते 21 लाख रुपये वरील कंपनीत गुंतवले. ती रक्कम ऑनलाईन व्हॅलेटमध्ये दाखवत असल्याने खडके यांनी टाटा कॅपिटलकडून 9 लाख 90 हजारांचे कर्ज घेऊन ती रक्कम कंपनीत गुंतवली. व्हॅलेटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम दिसत असल्याने खडके यांनी रकमेपैकी काही रक्कम परत मिळावी म्हणून कंपनीला तीनवेळा विनंती मेसेज केला. परंतु कंपनीने त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यामुळे खडके यांनी कंपनीला अनेक वेळा विनंती केली तेव्हा ‘तुम्हाला एवढा मोठा फायदा होतो आहे, तुम्ही कंपनीचे कमिशन म्हणून 11 लाख 2 हजार 367 रुपये जमा करा. आम्ही तुमचे 50 लाख रुपये विड्रॉल करण्यास मंजुरी देऊ…’ असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने 11 लाख रुपये भरले. त्यानंतर कंपनीने सरकारचा टॅक्स
म्हणून 8 लाख 81 हजार 893 रुपये भरण्यास सांगितले. खडके यांनी साडेतीन लाख भरले. मात्र, कंपनीने पूर्ण रक्कम भरल्याशिवाय तुमची रक्कम तुम्हाला मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे खडके यांच्या लक्षात आले.

खडके यांनी एकूण 39 लाख 35 हजार 867 रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली. कंपनीने त्यांना परतावा म्हणून केवळ 3 लाख 98 हजार 28 रुपये दिले. त्यामुळे कंपनीने आपल्याला 35 लाख 37 हजार 839 रुपयांचा गंडा घातल्याचे समजले. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत.