
कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या श्वानाची समाधी रायगडावरून 31 मेपर्यंत हटवा, अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तसे पत्र संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
शिवप्रेमींचा देखील या समाधीला विरोध असून वाघ्या श्वानाची समाधी शिवप्रेमींनी एकदा हटवली होती, मात्र प्रशासनाने पुन्हा तो पुतळा बसवला असून त्याला पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे म्हटले आहे. वाघ्या श्वानाची समाधी अलीकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्याची समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना 31 मेपूर्वी हटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.