पोलिसाच्या गळ्याला कोयता लावून 96 हजार लुटले, पैठण-पाचोड रस्त्यावर सुव्यवस्थेचे धिंडवडे

<<< बद्रीनाथ खंडागळे >>>

चोरट्यांशी आपला सामना झाला तर आपण ‘पोलीस… पोलीस !’ असा धावा करून मदत मागू. पण, चोरट्यांनी एखाद्या पोलिसाच्याच गळ्याला कोयता लावला… पोलिसाने ‘मी पोलीस आहे.’ असे म्हटल्यावरही त्यांना लुटले. तर पोलीसदादा कोणाचा धावा करणार ? असा प्रश्न पडावा. अशी खळबळजनक घटना पैठण-पाचोड रस्त्यावर घडली आहे.

ड्युटीवरील बीट अंमलदार रवींद्र आंबेकर यांना 4 लुटारूंनी भररस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवला. अन् रोख, मोबाईल व सोन्याची अंगठी असा 96 हजारांचा ऐवज लंपास करत सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले.

पैठण शहरासह तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर पोलिसांची भीती शिल्लकच राहिली नसल्याचे या लुटारुंनी अधोरेखित केले आहे. 7 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा चक्रावून टाकणारा प्रकार घडला आहे. पाचोड पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार रवींद्र आंबेकर हे कडेठाण बीट अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. दुपारी 4 वाजता त्यांनी आपल्या दुचाकीवरून (एम.एच.20- एफ.डब्ल्यू. 7068) बीट अंतर्गत गावांना भेटी दिल्या. शांतता आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

दरम्यान, पैठण रस्त्यावरून ते पाचोड पोलीस ठाण्याकडे परत निघाले. रात्री 8 च्या सुमारास भुमरे पेट्रोलपंपासमोर दोन दुचाकींवर चौघेजण मागून आले. त्यांनी आवाज दिल्याने जमादार रवींद्र आंबेकर यांनी दुचाकी थांबवली. तेव्हा चौघांनी जमादार रवींद्र आंबेकर यांना दमदाटी करत ‘तुझ्याजवळ जे जे काही आहे. काढून दे!’ असे सुनावले. यानंतर जमादार रवींद्र आंबेकर यांनी ‘ ‘मी पोलीस, आहे.’ असे सांगताच चौघे थोडा वेळ थांबले. त्यापैकी एकाने लगेच धारदार कोयता काढून धाक दाखवला.

केवळ 25 ते 30 वर्षे वय असलेल्या या चोरट्यांनी आंबेकर यांच्या खिशातील 3 हजारांची रोकड, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची 43 हजार रुपयांची अंगठी व 50 हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. विशेष म्हणजे जमादार रवींद्र आंबेकर यांनी आरडाओरडा केला. परंतु चोरट्यांनी पोबारा केला.

या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करावा की नाही. यावर पोलिसांनी बराच विचार केला. अखेर दुसऱ्या दिवशी 8 रोजी फिर्याद देण्यात आली. व 4 चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार अण्णासाहेब गव्हाणे हे पुढील तपास करीत आहेत.