
ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर कशी काळजी घ्यावी याबाबत पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना पोलीस आयुक्तालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या बळावर एका पोलीस अंमलदाराने ह्रदयविकाराचा झटका आलेल्या भाजीविक्रेत्याचे प्राण वाचवले. या कार्यतत्परतेमुळे प्राण वाचल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमलदाराचे अभिनंदन केले.
पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामदास बबनराव गव्हाणे हे कर्तव्यावर जात होते. मंगळवारी दुपारी दीड वाजता रस्त्यात भाजी विक्रेता रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे (40, रा. पेशवे नगर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही बाब गव्हाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ सीपीआर देऊन त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यामुळे सुलक्षणे यांचा जीव वाचला.
पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांच्या या उल्लेखनीय कार्याचे मनःपूर्वक कौतुक करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्यांचा सत्कार केला.