समर विजेता तर अमोघ उपविजेता

प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात समर चव्हाण आणि अमोघ शर्मा या दोघांनीही अपराजित राहत समान 4.5 गुणांची कमाई केली. अखेर सरस गुणगतीच्या आधारे समर चव्हाणला विजेते घोषित करण्यात आले.  त्यात समरला 13.25 तर अमोघला 12.75 असे गुण मिळाले आणि अवघ्या 0.50 गुणफरकांनी समर चव्हाणने बाजी मारली. अमोघला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर चार गुणांसहीत अदिश गावडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.  विजेत्याला सदानंद चव्हाण स्मृती चषकाने तर उपविजेत्याला नंदकुमार जांभेकर स्मृती चषकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडेची निवड करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या हस्ते पार पडले.