सामना अग्रलेख – देश घडवणारा नेता!

डॉ. मनमोहन सिंग हे एक सरळमार्गी गृहस्थ होते. साधेपणा व सचोटी हेच त्यांचे बळ होते. भारताच्या लोकशाही मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. पंडित नेहरूंनंतर आधुनिक भारताची नव्याने पायाभरणी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले व त्या कामास गती दिली. देश घडविणारा नेता ही त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. डॉ. मनमोहन सिंग यांच्या हातात देश सुरक्षित होता व राहिला हे आजची स्थिती पाहून वाटते. डॉ. मनमोहन सिंग यांना इतिहास व जनता कधीच विसरणार नाही. ते गेले, पण त्यांच्या ज्ञानाचा साठा व त्यांनी केलेली राष्ट्रसेवा मागे राहिली आहे.

राष्ट्रनिर्माणाचे महानायक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकारणातले सुसंस्कृत आणि इमानदारीचे अखेरचे पान गळून पडले आहे. 2024 मावळत असताना हा अचानक सूर्य अस्ताला गेला व अंधःकार पसरला. गेल्या दहा वर्षांपासून मनमोहन सिंग हे सत्तेवर किंवा राजकारणात सक्रिय नव्हते, पण जेव्हा जेव्हा इमानदारी व सत्य-सचोटीचा विषय निघे तिथे डॉ. सिंग यांचे नाव आदराने घेतले जात असे. मनमोहन सिंग यांनी 20 वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेताच नवभारताच्या पुनर्निर्माणास प्रारंभ झाला. आधी नरसिंह राव यांनी डॉ. सिंग यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती. देशाच्या तिजोरीत तेव्हा खडखडाट होता. 16 दिवस पुरतील इतकेच पैसे होते. अर्थमंत्रीपद स्वीकारणे हा तेव्हा आतबट्ट्याचा व्यवहार होता. नरसिंह रावांनी भारताची अर्थव्यवस्था राजकीय व्यक्तीच्या हाती न सोपवता एका निष्णात डॉक्टरच्या हाती सोपवून देशावर उपकार केले. पुढे भारतात जी अर्थक्रांती झाली त्यामुळे देशातल्या मध्यमवर्गीयांचे जीवनमान उंचावले. पुढे 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर भारताची अर्थव्यवस्था तिप्पट झाली. परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढला. परदेशी गुंतवणूक 2 बिलियन डॉलर्सवरून 36 बिलियन डॉलर्सवर गेली. व्यापार निर्यात 60 बिलियन डॉलर्सवरून 320 बिलियन डॉलर्सवर पोहोचली. परदेशी चलन साठा 100 बिलियन डॉलर्सवरून 315 बिलियन डॉलर्सवर गेला. 5 लाख किलोमीटर्सचे रस्ते ग्रामीण भागात बांधले गेले. मनमोहन सिंग यांच्याच काळात चांद्रयान, अणुऊर्जा प्रकल्पांना चालना मिळाली. मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्याच काळात झाली. आंतरराष्ट्रीय विमानतळे उभी राहिली.

इंदिरा आवास योजनेत

लाखो गरीबांना घरे मिळाली. वर्षाला 100 दिवस हमखास रोजगार देणाऱ्या ‘मनरेगा’सारख्या योजना सुरू झाल्या. दूरसंचार क्षेत्रात क्रांती झाली. ब्रॉड बॅण्ड आले. आठ कोटी जनतेला मोफत सिलिंडर्स देण्यात आले. हे सर्व मनमोहन सिंग यांनी संयमाने व तोंड बंद ठेवून केले. आकांडतांडव न करता, खोटे न बोलता, जुमलेबाजी न करताही देशाचे नेतृत्व करता येते हे डॉ. मनमोहन सिंग यांनी दाखवून दिले. डॉ. मनमोहन सिंग यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला समर्पित होते. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान श्री. मोदी हे 80-85 कोटी लोकांना माणशी 30 किलो धान्य फुकट देण्याचा डंका प्रचार सभांतून पिटतात. ही मूळ योजना डॉ. मनमोहन सिंग यांनीच आणली. 2013 मध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा आणून प्रत्येकाला जगण्याचा व पोटभर जेवणाचा अधिकार दिला. 2005 मध्ये मनमोहन सिंग यांनी माहितीचा अधिकार जनतेला दिला. त्या अधिकारावर हल्ले करण्याचे काम आता सुरू आहे. नोटाबंदीसारखे दळभद्री प्रकार मोदी काळात झाले. तेव्हा अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत फक्त सात मिनिटांचे भाषण केले व सांगितले की, ‘नोटाबंदीमुळे देशाचा ‘जीडीपी’ दोन टक्क्यांनी घसरेल. नोटाबंदी ही एक सुसंघटित लूट आहे. गैरव्यवस्थापनाचे स्मारक यानिमित्ताने बांधले गेले आहे.’ पुढच्या चार महिन्यांत देशाने अनुभवले की, जीडीपी 2.1 टक्क्यांनी घसरला. देशाची सामुदायिक लूट सुरू झाली व अर्थव्यवस्था कोसळली. नोकरदार वर्ग व लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. मोदी यांच्या काळात रुपयाचे पूर्ण अवमूल्यन झाले, पण मोदी व त्यांचे लोक मनमोहन सिंग व पंडित नेहरूंवर टीका करताना पातळी सोडून बोलत राहिले. सारी दुनिया ज्यांचा

सन्मान करते

अशा मनमोहन सिंगांना मोदी व त्यांच्या लोकांनी ‘मौनीबाबा’ म्हणून हिणवले, पण मनमोहन सिंग यांनी भारताच्या व जगभरातील मीडियाशी सदैव संवाद ठेवला. पंतप्रधानपदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत देश आणि विदेशात त्यांनी सव्वाशे पत्रकार परिषदा घेतल्या. त्यातील 72 पत्रपरिषदा त्यांनी विदेश दौऱ्यात घेतल्या. ‘‘पत्रकारांशी बोलताना मला संकोच वाटत नाही व भीतीही वाटत नाही,’’ असे डॉ. सिंग नेहमी सांगत. पत्रकारांचा कोणताही प्रश्न ते टोलवत नसत हे महत्त्वाचे. भारताच्या आर्थिक प्रगतीचा काळ डॉ. मनमोहन सिंग यांनीच सुरू केला. संसदेत भाषण करताना जुलै 1991 मध्ये त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने भारतीय अर्थ प्रगतीचे एक तत्त्वज्ञान मांडले. ते म्हणाले, ‘‘No power on earth can stop an idea whose time has come.’’ जगातली कोणतीही शक्ती भारताच्या प्रगतीत अडथळा ठरू शकणार नाही, असे ते म्हणाले व त्यांनी ते करून दाखवले. ‘‘History will be kinder to me than media,’’ असे उद्गार मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होताना काढले. ‘A man with uncommon wisdom,’ अशा शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी डॉ. सिंग यांचा गौरव केला. डॉ. मनमोहन सिंग हे एक सरळमार्गी गृहस्थ होते. साधेपणा व सचोटी हेच त्यांचे बळ होते. भारताच्या लोकशाही मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. पंडित नेहरूंनंतर आधुनिक भारताची नव्याने पायाभरणी करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले व त्या कामास गती दिली. देश घडविणारा नेता ही त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. डॉ. मनमोहन सिंग यांच्या हातात देश सुरक्षित होता व राहिला हे आजची स्थिती पाहून वाटते. डॉ. मनमोहन सिंग यांना इतिहास व जनता कधीच विसरणार नाही. ते गेले, पण त्यांच्या ज्ञानाचा साठा व त्यांनी केलेली राष्ट्रसेवा मागे राहिली आहे.