कुंभमेळ्यात अनेक भाविक बेपत्ता, आता आम्हाला राष्ट्रपतींकडूनच आशा आहे; अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

उत्तर प्रदेशात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात मौनी अमावास्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला तर काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. यासंदर्भात अनेक बातम्या, व्हिडीओ समोर येत आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कुंभमेळ्यातील बेपत्ता नागरिकांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्या X अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मध्य प्रदेशातील रहिवासी अशोक पटेल हे आपल्या वृद्ध वडिलांच्या शोधात रडताना दिसत आहेत. त्यांचे वडील तिजाई पटेल 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी महाकुंभात आले होते. मात्र, त्या दिवसापासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. त्यांना शोधण्यासाठी सगळी रुग्णालये, स्मशानभूमी पालथी घातली आहे. मात्र, तरीही वडिलांचा शोध लागला नसल्याचे अशोक यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले.

दरम्यान, सदर व्हिडीओ शेअर करताना अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. लोकांचे अश्रू अहंकाराच्या हिमालयालाही मागे टाकू शकतात. त्यामुळे सत्तेचा अहंकार त्याच्यासमोर काहीच नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे त्यांची व्यथा ऐकण्यासाठी आता राष्ट्रपतींकडून आशा केली जाऊ शकते. जेव्हा राष्ट्रपती महाकुंभला जातील, तेव्हा तेथील अपयशी भाजप सरकार आपले अपयश लपवण्यासाठी, अशा सर्व लोकांना राष्ट्रपतींसमोर आवाज उठवण्यापासून रोखणार नाही अशी आशा आहे, असे ते अखिलेश यादव म्हणाले.

मिळालेल्या महितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 फेब्रुवारी रोजी प्रयागराजला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.