‘सत्ताधाऱ्यांवरही तुमचा अंकुश असू द्या, विरोधकांनाही म्हणणे मांडण्याची संधी द्या’, अभिनंदनपर भाषणात अखिलेश यादवांनी सुनावले

ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. बिर्ला यांच्या निवडीबाबत सपाचे सर्वेसर्वा आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या अभिनंदपर भाषणात अखिलेश यादव यांनी लोकसभा अध्यक्षांना चांगलेच टोले लगावले आहेत. सर्वप्रथम अखिलेश यादव यांनी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या अभिनंदनपर भाषणात त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे नि:पक्ष आणि सर्वांना समान न्याय देण्याची मागणी केली.

काय म्हणाले अखिलेश यादव

सर्वप्रथम मी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन करतो. पंतप्रधानांसह सहकारी विरोधी पक्षांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, मी त्यांच्यासोबत तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून आलात. तुम्हाला पाच वर्षाचा नवीन आणि जुन्या सदनाचा अनुभव आहे. मी माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. ज्या पदावर तुम्हा बसलात, त्या पदाशी अनेक परंपरा जोडल्या आहेत आणि कोणताही भेदभाव न करता त्या परंपरा पुढे चालू राहतील असे आम्ही मानतो. तसेच लोकसभा अध्यक्षाच्या रुपात तुम्ही प्रत्येक खासदार आणि प्रत्येक पक्षाला समान संधी आणि सन्मान द्याल.

निःपक्षता ही या महान पदाची महान जबाबदारी आहे. आपण लोकशाहीचे न्यायाधीश म्हणून बसला आहात. आम्ही सर्व अपेक्षा करतो की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला दाबण्याचा प्रयत्न होणार नाही आणि हकालपट्टीसारखी कारवाई करुन सदनाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणार नाही. विरोधकांवर तर तुमचं नियंत्रण आहेच, पण सत्ताधाऱ्यांवरही तुमचं नियंत्रण असावं. अध्यक्ष महोदय तुमच्या इशाऱ्यावर सदन चालते, हे उलट होऊ नये. आपल्या न्यायप्रिय निर्णयांना आमचा पाठिंबा राहील.

मी पहिल्यांदा नवीन सदनात आलो आहे. मला वाटले होते, आमच्या लोकसभा अध्यक्षांची खुर्ची उंच असेल. नवीन सदनात आपल्या खुर्चीच्या पाठीमागे दगड तर बरोबर लावले आहेत, सर्वकाही ठीक आहे. पण मला अजूनही सिमेंटने भरलेल्या काही भेगा दिसत आहेत असा टोला त्यांनी टोला लगावला आहे. अध्यक्ष महोदय, मला आशा आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचा जितका आदर करता तितकाच तुम्ही विरोधकांचाही आदर कराल आणि आम्हाला आमचे मत मांडण्याची संधी द्याल.