प्रेक्षकांसाठी बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’चा संघर्ष, सहा दिवसांनंतरही शंभर कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री नाही

बॉलीवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ईदला प्रदर्शित झाला. परंतु सहा दिवसांनंतर सुद्धा या चित्रपटाचा 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री झाली नाही. प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे सपशेल पाठ फिरवल्याने सलमानच्या सिकंदरचा प्रेक्षकांसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. या चित्रपटाकडून सलमान आणि त्याच्या चाहत्याला फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, या चित्रपटाने सर्वांनाच निराश केले आहे.

या चित्रपटाने सहाव्या दिवशी केवळ 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे देशात या चित्रपटाची कमाई आतापर्यंत केवळ 94 कोटी रुपये झाली आहे. सिकंदरने पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी ईदची सुट्टी असल्याने 29 कोटी रुपये कमावले होते. परंतु, पाचव्या दिवशी 5.75 आणि सहाव्या दिवशी केवळ 3.75 कोटी रुपये कमावता आले आहेत. सिकंदरने जगभरात 169.78 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

मुंबईत शो हटवले

चित्रपटगृहात प्रेक्षकवर्ग येत नसल्याने मुंबईसह अनेक ठिकाणी ‘सिकंदर’चे शो कमी करण्यात आले आहेत. पहिल्या शो वेळी 8 हजारांहून अधिक शो लावले होते. परंतु आता याची संख्या 6200 च्या जवळपास आली आहे. मुंबईत 1300 हून अधिक शो लावले होते. परंतु, आता फक्त 820 शो सुरू आहेत. दिल्लीतही 300 शो कमी करण्यात आले आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला होता.