सलमान खानच्या घरी सुरक्षा व्यवस्थेत वाढ, बिष्णोई गँगच्या धमकीनंतर बाल्कनीत लावली बुलेट प्रुफ काच

काळवीट शिकार प्रकरणामुळे बॉलीवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. अशातच 2024 मध्ये त्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही, त्याचे जवळचे मित्र बाबा सिद्धीकी यांचीही हत्या केल्याने संपूर्ण खान कुटुंब चिंतेत पडले आणि सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलमानची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे. आता त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत बुलेट प्रूफ काच बसवण्यात आली आहे.

सलमान खानची सुरक्षा लक्षात घेता त्याचे घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये हा बदल करण्यात आला आहे. याशिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटच्या प्रत्येक कोपऱ्यात हाय सिक्युरिटी ट्रेसरही लावण्यात आले आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काचेची भिंत बांधण्यात आली आहे. ही तीच बाल्कनी आहे जिथून सलमान खान उभा राहून शेकडो चाहत्यांचे  ईद, दिवाळी आणि वाढदिवसानिमित्त आभार मानतो. मात्र त्याच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करून आता बुलेट प्रूफ काचेची भिंत बसवून ती बंद करण्यात आली आहे. यासोबतच खिडक्यांना बुलेट प्रूफ काचही लावण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही उच्च तंत्रज्ञान सुरक्षा उपकरणेही बसवण्यात आली आहेत. सध्या एका बाजुला बुलेट प्रुफ ग्लास लावण्यात आले आहे. दुसऱ्या ठिकाणी काम सुरू असून हाय सिक्युरीटी ट्रेसरही लावण्यात आले आहेत. सलमान खानच्या सुरक्षेसाठी घराच्या बाहेर हाय रेज्युलेशनवाले सीसीटिव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. तसेच घरासमोरच पोलिसांनी चौकी उभारली आहे.

गेल्या वर्षी 14 एप्रिलला सलमान खानच्या घराबाहेर 5 राऊंड गोळीबार करण्यात आला होता. काही महिन्यांनी सलमानचे जवळचे सहकारी आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचीही हत्या झाली होती. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.