सलमानच्या घराची गॅलरी, खिडक्या आता बुलेटप्रूफ; 24 तास कॅमेऱ्याचा वॉच

कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराची गॅलरी आणि खिडक्यांना बुलेटप्रूफ काचा बसविण्यात आल्या असून त्याच्या घराभोवती हाय रिझोल्युशनचे कॅमेरे लावले आहेत.

अभिनेता सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या पालकांसह राहतो. 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बंदुकीतून 4 राऊंड फायर करण्यात आले होते. गोळीबार त्याच भिंतीवर झाला, ज्यापासून थोडय़ा अंतरावर सलमानची बाल्कनी आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारली होती. सलमानचा जवळचा मित्र, आमदार बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या घटनेची जबाबदारीदेखील बिष्णोई टोळीने घेतली होती. तेव्हापासून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

गेल्या काही दिवसांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रिनोव्हेशनचे काम सुरू होते. आता अपार्टमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याची गॅलरी आणि खिडक्यांना बुलेटप्रूफ काचा बसविण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या घराभोवती हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.