राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार तसेच निवत्तीवेतन यंदा 31 ऑक्टोबरऐवजी 25 ऑक्टोबर रोजीच मिळणार आहे. संगणक प्रणालीचे हस्तांतरण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
वित्त विभागाच्या अंतर्गत येणाऱया ट्रेझरीनेट आदी संगणक प्रणालीचे डेटा मॅनेजमेंट होस्टिंगचे काम टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमार्फत करण्यात येते. आता हे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ही सर्व प्रणाली बंद ठेवावी लागणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱयांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार तसेच निवत्तीवेतन यास विलंब होऊ नये यासाठी 31 ऑक्टोबर रोजी देण्यात येणारा पगार व निवत्तीवेतन 25 ऑक्टोबरपूर्वी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.