
हिंदुस्थानातील नोकरदार मंडळी त्यांच्या पगारातील तब्बल 33 टक्क्यांहून अधिक रक्कम ईएमआयवर खर्च करतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यात जाते, अशी माहिती हाऊ इंडिया स्पेंड्स ः अ डीप डायव्हइनटू कंझ्युमर स्पेंडिंग बिहेविअर या अहवालातून समोर आली आहे. अहवालात हिंदुस्थानातील ग्राहकांच्या पगार खर्च करण्याच्या सवयींचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करण्यात आले. यात 30 लाखांहून अधिक तंत्रज्ञान जाणकार ग्राहकांच्या खर्चाच्या वर्तनाचे सर्वेक्षण करण्यात आले. हिंदुस्थानातील सर्वात मोठी बीटूबी सॅस फिनटेक कंपनी परफोजने पीडब्ल्यूसी इंडियाच्या सहकार्याने 19 फेब्रुवारी रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, 20 हजारांहून कमी कमाई करणारे ऑलाईन गेमिंगवर तब्बल 22 टक्के पैसे खर्च करत असल्याचे अहवालातून समोर आले. मध्यम शहरांमधील लोक मोठय़ा शहरांमधील लोकांपेक्षा दरमहा सरासरी 20 टक्क्यांहून अधिक वैद्यकीय खर्च करतात.
ऑनलाईन गेमिंगवर 22 टक्के खर्च
20 हजार रुपयांहून कमी उत्पन्न असलेले लोक ऑनलाईन गेमिंगवर 22 टक्के खर्च करत आहेत. तर उत्पन्न वाढत असताना मात्र ऑनलाईन गेमिंगवर खर्च करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होत जाते. 75 हजार रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांमध्ये हे प्रमाण केवळ 12 टक्क्यांपर्यंत कमी होते.
अशी आहे देयक पद्धत
आवश्यक खर्चासाठी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत म्हणजे ईसीएस तसेच आवश्यक जीवनशैलीसाठी यूपीआय ही सर्वाधिक पसंतीची पद्धत आहे.
या खर्चाला पर्याय नाही
बहुतेक पैसे घरभाडे, वीज बिल इत्यादींवर खर्च केले जातात, हे पैसे एकूण खर्चाच्या 39 टक्के आहेत. यानंतर 32 टक्के पैसे अन्न, पेट्रोल इत्यादी आवश्यक गोष्टींवर खर्च केले जातात. त्याच वेळी 29 टक्के पैसे जीवनशैली आणि छंदाशी संबंधित गोष्टींवर खर्च केले जातात. जीवनशैलीवर म्हणजेच फॅशन, खरेदी आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांवर 62 टक्के पैसे खर्च केले जातात. तर खाण्यापिण्यावर म्हणजेच बाहेरचे जेवण किंवा ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यावरील खर्चही वाढत चालल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.