काँग्रेसचे नेते आणि चांदिवली मतदारसंघाचे उमेदवार नसीम खान यांना कार्यालयाबाहेर उभे राहून संपर्क करू पाहणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले ते दोघे जण फेरीवाले असल्याचे समजते. आर्थिक मदतीसाठी ते कार्यालयाबाहेर आल्याचे बोलले जाते.
नसीम खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. गुरुवारी दोन जण त्याच्या कार्यालयाबाहेर उभे असल्याचे नसीम खान यांच्या सुरक्षेस असणाऱया सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. काही वेळात साकीनाका पोलीस घटनास्थळी आले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी मोबाईल आणि एक मोटरसायकल ताब्यात घेतली. त्या दोघांची कसून चौकशी केली. ते दोघे गेल्या आठवडय़ात उत्तर प्रदेश येथून मुंबईत आले होते. ते दोघे नसीम खान याचे प्रचार कार्यालय आणि कार्यालय येथे जाऊन खान याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवल्याचे समजते.