
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी गावातील लेंडी नदीवर असलेला पूल अतिपावसामुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालकांनी या मार्गाने जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
सध्या जामखेड-सौताडा महामार्गाचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. यातच सौताडाजवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, अंमळनेरकडे जाणारी वाहने पिंपळवाडीमार्गे वांजरा फाटा मार्गे जातात. यात अनेक बस पण याच मार्गाने जातात; पण आता पूल खचल्यामुळे वाहतूक ठप्प
झाली आहे.
पिंपळवाडी ग्रामस्थांनी भर पावसात नदी किनारी येऊन वाहनचालकांना आवाहन केले व वाहनांना माघारी पाठवले. यामध्ये काही बस आणि मोठय़ा प्रमाणावर खासगी वाहने परत पाठविण्यात आली. साकत-कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.
रविवारी जामखेड परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे नदीला पूर आला होता. यातच पिंपळवाडीजवळील लेंडी नदीवर असलेल्या पुलाला आगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. आता तर पूलच खचला आहे. पिंपळवाडीचे ग्रामस्थ दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, ईश्वर घोलप, मनोज नेमाने, शरद घोलप, धीरज नेमाने, प्रवीण घोलप, विशाल मोहिते यांनी मदत केली. तसेच वाहनचालकांनी या मार्गी न येता साकत-पाटोदामार्गे जाण्याचे आवाहन केले.