
नऊ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सैराट’ या नागराज मंजुळेच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नागराजच्या आर्ची आणि परश्याने वेड लावलं होतं. आर्ची आणि परश्याचा फॅन फाॅलोवर हा केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर जगभर तयार झाला. सैराट या चित्रपटाने बाॅलीवूडलाही वेड लावलं, त्यावरच बाॅलीवूडमध्ये ‘धडक’ हा रिमेक चित्रपटही तयार करण्यात आला. एकूणच काय सैराटची घौडदोड ही अफलातून होती यात काही वादच नाही.
‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले असं म्हटल्यास वावगं ठरु नये. ‘सैराट’ चित्रपटाच्या तिकीटांसाठी काळा बाजार तर व्हायचाच, पण त्याही जोडीला पहाटे चार वाजल्यापासून तिकीटखिडकीबाहेर रांगा लागायच्या. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सध्याच्या घडीला आधी प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याचा सपाटा लागलेला आहे. यामध्ये ‘सनम तेरी कसम’, ‘राॅकस्टार’, ‘रहना हैं तेरे दिल मे’, ‘लैला मजनू’, ‘करण अर्जुन’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असल्यामुळे, सध्याच्या घडीला जुन्या चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.
मराठीमध्ये सध्याच्या घडीला ‘सैराट’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा नुकतीच झी स्टुडीओज यांनी केली आहे. चित्रपट पुन्हा प्रदर्शिंत होणार हे ऐकताच सैराटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नऊ वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पिरतीचं वारं वाहणार यात वाद नाही.
‘सैराट’ हा चित्रपट येत्या २१ मार्चपासून पुन्हा प्रदर्शित होणार असून, पुन्हा येणाऱ्या या चित्रपटालाही प्रेक्षक भरभरुन दाद देतील यात काही वादच नाही.