तुकोबा निळोबाच्या जयघोषात संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे प्रस्थान; श्रीक्षेत्र पिंपळनेर दुमदुमले

एकोबा, तुकोबा, निळोबाच्या जयघोषात व टाळ, मृदुंगाच्या गजरात संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि.2) श्रीक्षेत्र पिंपळनेर (पारनेर) येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. प्रस्थानापूर्वी संत निळोबाराय महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते महापुजा झाली.यावेळी सनई चौघड्याच्या मंगलमय सूरांनी वातावरण भक्तिमय झाले होते.प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांच्या दिंड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

निळोबाराय देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोकराव सावंत, पालखी सोहळा प्रमुख,संत निळोबारायांचे वंशज ह.भ.प गोपाळबुवा महाराज मकाशिर,सुरेश पठारे, पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लंटाबळे,उपसरपंच छाया कळसकर, डॉ.श्रीकांत पठारे,डॉ.भास्कर शिरोळे, किसनराव रासकर,विजय गुगळे बाळासाहेब गाडे,संपत गाजरे, विणेकरी ह.भ‌प मारुती रासकर, भाऊसाहेब लंटाबळे, देवस्थानचे सचिव लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के अनिल पोटे निलेश लंटाबळे आदी उपस्थित होते.

संत निळोबारायांच्या रथाला रांधे येथील संतोष काटे यांनी खास पालखी सोहळ्यासाठी खरेदी केलेली सर्जा,राजाची देखणी बैलजोडी जुंपण्यात आली आहे.तर सिध्देश्वरवाडी व पुणेवाडी येथील दिंड्याच्या वतीने पालखी सोहळ्याला नगारा व बैलगाडी भेट देण्यात आली आहे. सोमवारी संत निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याचे निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रतिकात्मक प्रस्थान झाले. संत निळोबाराय महाराजांनी समाधी मंदिरात मुक्काम केला.त्यानंतर मंगळवारी दुपारी 3 वाजता पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

संतांचे मानवजातीवर थोर उपकार आहेत. संत विचारांमुळे, त्यांच्या शिकवणीमुळे आपली संस्कृती टिकून आहे.संतांच्या संगतीमुळे, संत विचारांच्या आचरणामुळे मानवी जीवनाचे कल्याण होते.संतांचे उपकार विसरणे हा कृतघ्नपणा ठरेल.तरुणाई मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायाकडे आकर्षित होत आहे हे चित्र आशादायी आहे.
– अण्णा हजारे,ज्येष्ठ समाजसेवक