सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यानं शाहरूखच्या ‘मन्नत’चीही रेकी केली, शिडी लावून वर चढला, पण…

अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वांद्रेसारख्या एका पॉश भागात झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडालेली असताना आता याच संदर्भात एक झोप उडवणारी बातमी आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीसारख्या एका व्यक्तीने अभिनेता शाहरूख खान याच्या मन्नत या घराचीही रेकी केली होती. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

14 जानेवारी 2025 रोजी एका अज्ञात व्यक्तीने शाहरूख खान याच्या घराची रेकी केली होती. शाहरूखच्या मन्नतजवळील रिट्रिट हाऊसच्या मागे 6 ते 8 फुट उंचीची लोखंडी शिडी लावून एक व्यक्ती घराच्या आत डोकावण्याचा आणि प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसला होता. शाहरूखच्या घराची रेकी करणारा आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण शाहरूखच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची उंची आणि शरीरयष्टी एकसारखी आहे.

दरम्यान, शाहरूख खान याच्या घराला सुरक्षेचे कडे आहे. त्याची खासगी सुरक्षा रक्षकही आहेत. यासह मन्नतच्या चहूबाजूने सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत. तसेच भिंतीला जाळ्याही लावण्यात आलेल्या आहेत. ही कडेकोट सुरक्षाव्यवस्था पासून सदर व्यक्तीने आत घुसण्याचा विचार सोडून दिला असावा अशी शक्यता आहे.

एक जण ताब्यात

सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याला वांद्रे पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दावा फेटाळला

दरम्यान, सैफवरील हल्ल्यानंतर पोलिसांनी शाहरूखच्या मन्नतबाहेर घडलेल्या घटनेचीही चौकशी सुरू केली. याबाबत शाहरूखकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच सदर व्यक्तीचा घरात घुसण्याचा प्रयत्न होता असा दावाही पोलिसांनी फेटाळला आहे.