Saif Ali Khan Attack : हल्लेखोराला पकडायला 200 पोलिसांचा फौजफाटा, 72 तासानंतर शरीफुल सापडला

आरोपी कितीही हुशार असला तरी मुंबई पोलीस त्याला पकडतातच. म्हणूनच जगात मुंबई पोलिसांचा वेगळा ठसा आहे. परंतु सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीला पकडण्यात पोलिसांना पटकन यश मिळाले नाही. एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. सुमारे 200हून अधिक पोलीस त्याला पकडण्यासाठी आकाशपाताळ एक करत होते. 300हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पण सराईत गुन्हेगार नसलेल्या बांगलादेशी शरीफुलला पकडण्यासाठी 72 तास लागले.

खबऱयाचे जोरदार नेटवर्क, तांत्रिक तपासात हातखंडा, झटपट कारवाई करण्यात माहीर अशी मुंबई पोलिसांची ओळख आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेची तर वेगळीच ओळख आणि दरारा आहे. गुन्हेगारांची पुंडलीच गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन बसायचे. खबऱ्यांच्या आधारे कितीही सराईत आरोपी असला तरी त्याला शिताफीने पकडायचे. पण सैफ अली खान हल्ला प्रकरणात काहीसे वेगळे चित्र दिसले, असे माजी अधिकारी सांगतात. आरोपी सापडला ही दिलासादायक बाब असली तरी त्याला 72 तास लागले. गुन्हा केल्यानंतर बराच वेळ तो वांद्रे परिसरात होता. तेथून तो दादर, अंधेरीला गेला. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. तो अगदी निवांत, निश्चिंतपणे फिरताना दिसला. पण त्याच्यावर हात टाकण्यासाठी पोलिसांना 72 तास लागले. विशेष म्हणजे 200हून अधिक पोलिसांचा फौजफाटा आरोपीला पकडण्यासाठी झटताना दिसला. ठाण्यात जाऊन लपलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना एवढे परिश्रम घ्यावे लागले. सीसीटीव्ही, तांत्रिक बाबी असतानाही अशी अवस्था होती. पूर्वी मानवी कौशल्याच्या जोरावर आरोपींना झटपट पकडले जायचे, असेही माजी अधिकारी सांगतात.

हाताचे ठसे तपासात उपयुक्त ठरणार

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी आणखी माहिती समोर आली आहे. जेव्हा सैफ अली खान आणि मोहमद शरीफुल इस्लाम शहजादमध्ये झटपट झाली तेव्हा मोहमद शरीफुल इस्लाम शहजादने पाठीमागून हल्ला केला असे तपासात समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी 19 ठिकाणी हल्लेखोर मोहमद शरीफुल इस्लाम शहजादच्या हाताचे ठसे मिळाले आहेत. हाताचे ठसे हे पुरावा म्हणून तपासात उपयुक्त ठरणार आहेत.

सैफच्या घरात महिला आणि पुरुष नोकर आहेत. सैफवर हल्ला झाला तेव्हा पुरुष नोकर घरात उपस्थित होते. आवाज आल्यावर सैफ रूमच्या बाहेर आले तेव्हा सैफ व शरीफुलमध्ये झटपट झाली. झटापट झाल्यावर शरीफुलने सैफला मागून मिठी मारून चापूने हल्ला केला. हा हल्ला झाला तेव्हा सैफच्या घरातील एकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाला संपर्प करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. सैफवर हल्ल्याची घटना घडली तेव्हा एक सुरक्षा रक्षक इमारतीमधील केबिनमध्ये होता, तर दुसरा मागील बाजूस नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे इमारतीमधील खासगी सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले.

पुरावे गोळा करण्यावर भर

शरीफुलने ज्या पद्धतीने हल्ला केला ते पाहता तो पूर्वतयारीने आला होता. त्याच्याविरोधात मुंबईत गुन्हे असल्याची नोंद नाही, मात्र बांगलादेशात गुन्हे असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे, तर पोलिसांनी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. घटना घडल्यानंतर तो पुठे पुठे गेला होता, त्याने त्याचे कपडे पुठे लपवले होते, हे तपासले जात आहे. हल्ला करण्यापूर्वी त्याने इमारतीची रेकी केली होती का, याबाबतदेखील पोलीस तपास करत आहेत.

तपास पथकाचा केला गौरव

सैफ अली खान याच्यावर हल्ला करून पळालेल्या शरीफुलला पकडण्यासाठी 200 पोलीस अधिकारी कर्मचाऱयांचे पथक तयार केले होती. तपास पथकात असणाऱया पोलिसांचा आज प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मोहमद हा क्रीडापटू?

सैफवर हल्ला करणारा मोहमद शरीफुल हा क्रीडापटू असल्याचे समजते. त्याने बांगलादेशात जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतल्याचे समजते. जेव्हा पोलिसांच्या पथकाने हिरानंदानी येथून शरीफुलला ताब्यात घेतले तेव्हा त्याने तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. त्याला तो पुठल्या जिह्यात राहतो, अशी विचारणा केली तेव्हा त्याच्या नातेवाईकाला पह्न केले. त्याने जेव्हा शरीफुलची कागदपत्रे पाठवली तेव्हा तो बांगलादेशी असल्याचे समोर आले.

सारख्या चेहऱयामुळे मनस्ताप

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली होती. संशयितांपैकी ग्रॅन्टरोड येथे राहणारा शाहिद शेख आणि पुलाबा येथे राहणारा आकाश कनोजियाला याचा नाहक त्रास झाला. त्या दोघांचा चेहरा हल्लेखोर मोहंमद शरीफुलसारखा दिसत असल्याने त्या दोघांची देखील पोलिसांनी चौकशी केली होती.

अभिनेत्यावर हल्ला झाल्याने बॉलीवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने मुंबई पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. प्रसारमाध्यमात विविध पैलूने बातम्या प्रसारित होत होत्या. नेमका हल्लेखोर कोण हे स्पष्ट होत नव्हते. यादरम्यान पोलिसांना सैफच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. हल्लेखोराच्या चेहऱयासारखा दिसणारा एकजण ग्रॅन्टरोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी खबऱयाच्या मदतीने शाहिद शेखला ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी केली. हल्लेखोर हा शाहिद शेख नसून दुसराच असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

नंतर शनिवारी सायंकाळी रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्ग चौकीने मुंबई पोलिसांना एका संशयिताचा पह्टो पाठवला. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱया आकाश कनोजियाला गोंदिया व रांजणगाव दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हल्लेखोर सापडला ही माहिती वाऱयासारखी पसरली. सैफवर हल्ला करणारा आकाश कनोजिया नसून दुसराच असल्याचे मुंबई पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना सांगितले. तो विनातिकीट प्रवास करत होता. चेहऱयात साम्य दिसत असल्याने आकाशला नाहक त्रास झाला.