बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून आता महायुती सरकारवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. बीडपासून मुंबईपर्यंत कायदा-सुव्यवस्था कुठेही नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. यानंतर या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
वाईट गोष्ट एकच आहे की मुंबईची कायदा-सुव्यवस्था आता किती ढासळतेय याचं हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याच भागात एक हत्या झाली होती. आणि आता हा दुसरा हल्ला. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृहखातं त्यांच्याकडे आहे. त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्यानं बघावं, असे शरद पवार म्हणाले.
SAIF सुद्धा SAFE नाही! विरोधकांनी सोडले महायुती सरकारवर टीकेचे बाण
‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत’
जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो. अशा प्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.