Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात, वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वांद्रे पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्तीतील सत्गुरू शरण या इमारतीमधील 11 व 12 व्या मजल्यावर सैफ अली खान हा त्याची पत्नी अभिनेत्री करिना कपूर आणि दोघा लहान मुलांसोबत राहतो. बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक चोरटा सैफच्या 11 व्या मजल्यावरील घरात घुसला. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सैफचा लहान मुलगा जहांगीर त्याच्या बेडरूममध्ये झोपला असताना त्यांच्यासोबत त्याची देखभाल करणाऱया स्टाफ नर्स एलियामा फिलिपा (54) आणि आया जुनू या दोघी झोपल्या होत्या.

दरम्यान, काहीतरी आवाज आल्याने फिलिपा यांना जाग आली. त्यामुळे त्या उठून बसल्या. त्यावेळी त्यांना रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा व बाथरूमची लाईट चालू दिसली, पण करिना जहांगीरला भेटायला आल्या असाव्यात असे समजून फिलिपा पुन्हा झोपल्या, परंतु पुन्हा काहीतरी चुकीचे होत असल्याचा त्यांना भास झाला. त्यामुळे त्या पुन्हा उठून बसल्या. त्यावेळी बाथरूमच्या दरवाज्यावर एक टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली त्यांना दिसली. त्यामुळे बाथरूममध्ये कोण आहे हे पाहण्याचा त्या प्रयत्न करीत असताना बाथरूममधून एक व्यक्ती बाहेर आला व तो जहांगीरच्या बेडजवळ जाऊ लागला. ते पाहून फिलिपा पटकन उठल्या व जहांगीरच्या बेडजवळ धावल्या.

आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत पळाले

त्याचवेळी जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली. तिचा आवाज एकून सैफ व करिना धावत रूममध्ये गेले. आरोपीस बघून सैफने त्यास ‘कोण है, क्या चाहिए?’ असे विचारले तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तू व हेक्सा ब्लेडने सैफवर हल्ला केला. त्यावेळी गीता मधे आली असता तिच्याशीदेखील हल्लेखोराने झटापट केली व तिच्यावरही हल्ला केला. त्यावेळी सैफने त्याच्यापासून कशीबशी सुटका करून घेत आम्ही सर्व रूमच्या बाहेर धावलो, असेही फिलिपा यांनी जबाबात म्हटले आहे.

जिवाचा धोका टळला

सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लॅस्टिक सर्जरी झाली आहे. दोन खोल जखमा आहेत. अडीच इंचाचे चाकूचे टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आले. आता प्रकृती स्थिर आहे, जिवाला धोका नाही, असे लीलावती रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर सैफला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. आज त्याला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवून उद्यापर्यंत डिस्चार्ज दिला जाईल अशी शक्यता आहे.