Saif Ali Khan Attack – ‘सैफच्या मुलाचाच बळी जाणार होता, पण सत्य बोलण्यास…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

गुरुवारी पहाटे मुंबईतील वांद्रे भागात अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. इमारतीमध्ये घुसून हल्लेखोराने एक कोटींची खंडणी मागत सैफला चाकूने भोसकले. यात सैफ गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. हा हल्ला होऊन 48 तास उलटले असले तरी अद्याप हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मुंबई पोलिसांचे 30 हून अधिक पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप पोलिसांचे हात रिकामे आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत एक खळबळजनक दावा केला आहे.

सैफ अली खान हा प्राणघातक हल्ल्यातून बचावला. खरे तर हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमूरलाच ठार मारायचे होते. मात्र नशिबाने तो बचावला. हे सत्य कुणीही सांगणार नाही. तैमूर या नावामुळे त्याचा द्वेष केला जात आहे, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले.’

सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध

तैमूर समाजमाध्यमांमध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून, प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले.

तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे, असेही ते म्हणाले.