बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शाहजाद याची कसून चौकशी सुरू असून त्यात तो रोज नवनवीन खुलासे करत आहे. जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळल्याचा दावा मोहम्मद शरीफुलने केला होता. तसेच कुस्तीगीर असल्यामुळेच सैफवर हल्ला करू शकलो असे त्याने म्हटले आहे; परंतु तो कधीच कुस्ती खेळला नाही असे म्हणत त्याचे वडील मोहम्मद रुहुल आमीन यांनी त्याचे अनेक दावे फेटाळून लावले आहेत.
त्याला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची मोहम्मद आमीन यांनी उत्तरे दिली. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी शरीफुलशी बोलणे झाल्याचे वडिलांनी सांगितले. शरीफुलला दर महिन्याच्या दहा आणि पंधरा तारखेदरम्यान पगार मिळायचा. तो महिन्याला दहा ते पंथरा हजार रुपये पाठवायचा. तो मुंबईत एका हॉटेलात काम करायचा. त्याच हॉटेल मालकाने शरीफुलला अटक केल्याचा व्हिडीओ आम्हाला पाठवला होता. असे शरीफुलच्या वडिलांनी सांगितले. तसेच हिंदुस्थानात अवैधररीत्या आला होता. त्याच्यासोबत कोणतीच कागदपत्रे नव्हती असेही त्यांनी सांगितले.