
मराठी सिनेमा आणि लावणी यांचं नातं हे पूर्वीचं आहे. लावणी आणि बतावणी ही पूर्वीच्या सिनेमांमध्ये खूप पाहायला मिळायची. काळ बदलला आणि काळाप्रमाणे मराठी सिनेमानेही कात टाकली. तरीही सध्याच्या घडीला एखादी लावणी सिनेमात पाहायला मिळते. या लावणीसाठी स्पेशल कथानकामध्येही बदल केले जातात आणि लावणी गीताचे बीज रोवले जाते.
आगामी ‘देवमाणूसमध्ये‘ सिनेमामध्येही आपल्याला लावणी नृत्य पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील लावणी नृत्य चित्रित झालंय सई ताम्हणकर हिच्यावर. सई ही पहिल्यांदाच लावणी नृत्य करताना आपल्याला दिसणार आहे. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील कथानाकाचा बाज हा चांगलाच बदललेला आहे. म्हणूनच मराठी सिनेमाविश्व आता आपल्याला कात टाकताना दिसत आहे.
सईने या चित्रपटात केलेले लावणी नृत्य ही या चित्रपटातील एक जमेची बाजू असल्याचे म्हटले जाते. मुख्य म्हणजे याआधी सईने कधीच लावणी नृत्य केले नसल्याने, तिला या चित्रपटासाठी लावणी नृत्य करताना बरीच तयारी करावी लागली होती. तब्बल 33 तास सईने या लावणीसाठी तयारी केली होती. तेव्हा कुठे तिला हे नृत्य साकारता आले.