संपूर्ण जगाला सैराट करून सोडणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “मटका किंग” वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिची वर्णी लागली आहे. यात सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
यंदाचे वर्ष सईसाठी बॉलिवुडमय ठरतंय यात शंका नाही. एकामागोमाग एक असे दमदार प्रोजेक्ट्स ती करणार आहे. “भक्षक” या हिंदी वेब शोनंतर सई ने “अग्नी”, “ग्राउंड झिरो” आणि आता “मटका किंग” अश्या उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्टसमध्ये झळकणार आहे. सई आणि नागराज मंजुळे पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने प्रेक्षकांनी मोठी पर्वणीच मिळणार आहे.
नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्टमध्ये देखील होती. आता आम्ही “मटका किंग” या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सईने दिली. दरम्यान, विजय वर्माही या प्रोजक्टचा भाग असून त्याच्यासोबती स्क्रिन शेअर करण्यासाठी सई उत्साही आहे.
“ग्राउंड झिरो”, “अग्नी” सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता “मटका किंग” वेब सीरिज या व्यतिरिक्त सई “डब्बा कार्टेल” वेब सीरिजमध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होणार असून यात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.