साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

आज संपूर्ण राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर साईभक्तांना आनंदाची बातमी मिळाली आहे. साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता साई संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा पाच लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरवर्षी साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. मात्र, दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थानच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना आता पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, साईभक्तांनी दर्शनाला येण्याअगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.