शिर्डीत साईभक्तांना हार, फुले वाजवी दरात मिळणार हायकोर्टाने दिली परवानगी; लुटीवर पण लक्ष राहणार

शिर्डीत आता साईभक्तांना वाजवी दरात हार, फुले मिळतील. गेल्या वर्षी तसा ठराव करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत हार, फुले विव्रेत्यांकडून साईभक्तांची लूट होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासन व पोलीस घेणार आहेत.

या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. साईभक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱया हार, फुलांची विल्हेवाट कशी लावली जाणार याबाबतही लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे आदेश या औरंगाबाद खंडपीठाने समितीला दिले आहेत.

दर फलक दर्शनी भागात लावले जाणार

साई मंदिरात हार, फुलांची विक्री केली जाणार आहे. यामध्ये कोणाचीही मध्यस्थी नसणार आहे. विक्रीला असणाऱया हार, फुलांचे दर फलक साई मंदिर परिसरातील दर्शनी भागात प्रशासनाकडून लावले जाणार आहेत. तशी तरतूद ठरावात करण्यात आली आहे.

काय आहे ठराव

हार, फुले विक्रीत साईभक्तांची लूट होत होती. याबाबत गुन्हेही दाखल झाले. कोरोनाकाळात हार, फुलांवर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या वर्षी समितीमार्फत ठराव करण्यात आला. 384 हेक्टरवर शेतकरी फुलांची शेती करतात. साई मंदिरात हार, फुलांवर बंदी घातली तर मजूर व व्यापाऱयांचे आर्थिक नुकसान होईल. शिर्डीजवळील कोणत्याच बाजारात फुलांचा लिलाव होत नाही. त्यामुळे यापुढे व्रेडिट सोसायटी शेतकऱयांकडून फुले विकत घेईल. तसेच साईभक्तांना वाजवी दरात हार, फुले उपलब्ध केली जातील, हे मुद्दे ठरावात मंजूर करण्यात आले.