![sachin tendulkar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/06/sachin-tendulkar-696x447.jpg)
>> रविप्रकाश काकर्णी
प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त मराठी संशोधन पत्रिकेने ‘प्राध्यापक रमेश तेंडुलकर’ विशेषांकाचे प्रकाशन, रमेश तेंडुलकर यांच्या ‘सहवासातील साहित्यिक’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे तसेच त्यांचे चिरंजीव नितीन तेंडुलकर यांच्या ‘उडता उडता’ व ‘अधिक उंच उडता उडता’ या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या 23 मे 2024 रोजी प्रकाशित झाल्या.
सचिन तेंडुलकर, शरद पवार, राजा दीक्षित यांच्या हस्ते ‘सहवासातील साहित्यिक’, नितीन तेंडुलकरची दोन पुस्तके आणि रमेश तेंडुलकर विशेषांकाचे प्रकाशन झाले. मात्र सगळ्या समारंभाचे आकर्षण अर्थातच सचिन तेंडुलकर हेच होते. अजूनही सचिनची क्रेझ प्रचंड आहे हेच खरे. हे कशाला, शरद पवार यांनीदेखील विचारलं, “सचिन केव्हा येणार आहे?” पाच वाजता हे कळताच ते म्हणाले, ‘मग मी पावणेपाच वाजताच येतो.’ त्याप्रमाणे दोघेही ठरल्या वेळेला आले.
यानिमित्ताने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात रमेश तेंडुलकर यांच्या पुस्तकांचे आणि त्यांच्या संबंधातील आलेल्या लेखांचे, मासिकांचे प्रदर्शन भरवले होते. त्याला आणि संदर्भ विभागाला सचिनने भेट दिली. या भेटीचा तेथील स्टाफला कोण आनंद झाला होता! तो त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून दिसत होता. रमेश तेंडुलकर हे आपले लिखाण ग्रंथबद्ध होण्यासाठी उदासीनच होते. त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेला एकमेव लेखसंग्रह म्हणजे ‘गीत भान’! आनंद अंतरकरांच्या विश्वमोहिनी प्रकाशनातर्फे तो प्रकाशित झाला होता. त्याला रमेश तेंडुलकर तयार कसे झाले ते एकदा बघायला पाहिजे. अंतरकरांचा तेंडुलकरांवर ‘कवडसे’ नावाचा एक लेख आहे. त्यात काही संदर्भ मिळतात का, ते पाहायला हवे.
एरवी रमेश तेंडुलकर चोखंदळ वाचकांनाच माहीत होते. त्यामुळे ते गेल्यानंतर अनेकांच्या लेखी ते सचिन तेंडुलकरचे वडील हीच त्यांची ओळख होती. मात्र तेव्हा गिरगावातल्या साहित्य संघातर्फे निघणाऱया ‘साहित्य’ त्रैमासिकाने रमेश तेंडुलकरांवर माहितीपूर्ण अंक काढला होता. त्या मुखपृष्ठावर रमेश तेंडुलकर यांचा देखणा फोटो होता (हाच फोटो ‘मराठी संशोधन पत्रिके’ने विशेषांकावर लावला आहे.) तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात असलेल्या शशिकांत भगत यांनी तेंडुलकर यांच्या साहित्याची परिश्रमपूर्वक केलेली, संदर्भमूल्य असलेली सूची त्यात होती. तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी (18 मे 2000) ‘सहवासातील साहित्यिक’ हा लेखसंग्रह शिवा घुगे यांच्या प्रभात प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला. या पुस्तकाचे संपादन प्रदीप कर्णिक यांनी केले होते. शिवाय त्याच्या जोडीला त्यांचा रमेश तेंडुलकरांशी जो प्रदीर्घ संबंध राहिला त्याबाबत ‘बाप दोस्त’ हा लेख होता, ज्यात स्वतच्या आयुष्यावर तेंडुलकर यांचा प्रभाव किती आहे हे त्यांनी सांगितलेच, शिवाय तेंडुलकर यांच्या आयुष्यातील कित्येक अपरिचित हकीकती त्यांनी दिलेल्या होत्या. विशेष म्हणजे हा लेख खुद्द रमेश तेंडुलकर यांनी आधी वाचलेला होता. तसेच नितीन तेंडुलकर यांनी आपले वडील गेल्यावर त्यांच्यावर जो लेख लिहिलेला होता, त्याचाही समावेश या पुस्तकात केलेला होता. रमेश तेंडुलकर यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे.
रमेश तेंडुलकर यांचा 25 वा स्मृतिदिन येतो आहे यानिमित्ताने ‘मराठी संशोधन पत्रिके’चा रमेश तेंडुलकर विशेषांक काढायचे ठरले. काही काळ रमेश तेंडुलकर या मंडळाचे संचालक होतेच. त्या काळातील त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार होती. त्याच्या जोडीलाच ‘सहवासातील साहित्यिक’ पुस्तकात काही लेखांची आणि विस्तृत सूचीची भर घालून नवी आवृत्ती डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होण्याचे ठरले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्पामाला साक्षात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा सहभाग होता. यानिमित्ताने त्यांची प्रसन्ना संत यांनी घेतलेली मुलाखत नेमकी होती, ज्यात आपले वडिलांचा आपल्यावर काय परिणाम झाला हेच नेमकेपणाने त्याने सांगितले. या कार्पामाचा हा कळसाध्याय ठरला! एकूण सर्व तेंडुलकर यांचा तो दिवस संस्मरणीय असाच होता आणि रसिक श्रोत्यांनादेखील हे अनुभवता आले.