सगेसोयरे अधिसूचनेची सात महिन्यांनंतरही अंमलबजावणी नाही; वाशीत खोके सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी खोके सरकारने काढलेल्या सगेसायरे अधिसूचनेची अंमलबाजवणी सात महिन्यांनंतरही झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 27 जानेवारी रोजी उधळलेला गुलाल हा विजयाचा नाही तर फसवणुकीचा ठरला आहे. त्यामुळे संतप्त मराठा समाजाने ज्या चौकात गुलाल उधळला गेला त्याच चौकातून आजपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या वतीने खोके सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वाशीचा सर्व परिसर दणाणून गेला. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज लाखोंच्या संख्येने २६ जानेवारी रोजी नवी मुंबईत डेरे दाखल झाला होता. हे भगवे वादळ पाहिल्यानंतर आझाद मैदानाकडे निघालेला हा मोर्चा शासनाने नवी मुंबईतच अडवला. मराठा समाजाचा आक्रोश पाहिल्यानंतर खोके सरकारची तंतरली. सगेसोयरे अधिसूचना काढण्यात आली. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी २७ जानेवारी रोजी वाशी येथे येऊन केली. त्यावेळी जेसीबीमधून गुलाल उधळण्यात आला. मात्र हा गुलाल विश्वासाचा नाही तर विश्वासघाताचा ठरला आहे. ही अधिसूचना निघून सात महिने उलटले तरी तिची अंमलबाजावणी झाली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यानंतरही खोके सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणताच निर्णय घेत नाही. त्यामुळे नवी मुंबईत ज्या ठिकाणी फसवणुकीचा गुलाल उधळण्यात आला त्याच ठिकाणी मराठा समाजाने आजपासून उपोषण सुरू केले आहे.

अखेर गुलालाचा आब राखलाच नाही
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देताना सगेसोयरे यांचाही विचार करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ही मागणी मान्य करून राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी तशी अधिसूचनाही काढली होती. त्यानंतर वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीमधून गुलाल उधळण्यात आला होता. या गुलालाचा आब राखा, असे आवाहन त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले होते. मात्र सात महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या या अधिसूचनेची अद्यापपर्यंत अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गुलालाचा आब राखला गेला नाही, अशी संतप्त प्रक्रिया विनोद पोखरकर, बन्सी डोके, माऊली बर्गे यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन छेडले. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही समाज बांधवांनी आत्मबलिदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. हैद्राबाद गॅजेटियर, सातारा गॅजेटियरची अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या.