सागर कातुर्डे पुन्हा ‘भारत श्री’

29 राज्ये आणि त्यातून आलेले तब्बल 375 शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार संघर्षात आयकरच्या सागर कातुर्डेने गतविजेत्या रॉबी मैतेईला मागे टाकत पुन्हा एकदा ‘भारत श्री’ किताबावर आपले नाव कोरले. सागरने 2021 मध्येही ‘भारत श्री’चा पहिल्यांदा मान पटकावला होता. महाराष्ट्राचा हरमीत सिंग सर्वोत्कृष्ट प्रगतिकारक खेळाडू ठरला. तसेच महाराष्ट्राने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके जिंकत पुन्हा एकदा सांघिक जेतेपदाचाही मान पटकावला.

हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघाच्या वतीने साईनगर शिर्डी येथे आयोजित केलेल्या 65 व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली. एकंदर मुख्य शरीरसौष्ठवातील दहा गटांसह फिजिक फिटनेसच्या आठ आणि महिलांच्या दोन अशा 20 गटांमध्ये ही थरारक स्पर्धा रंगली. महाराष्ट्राच्या उमेश गुप्ता (70 किलो), उदय देवरे (75 किलो), हरमीत सिंग (100 किलो) या तिघांनी मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत गटविजेतेपद संपादले, तर मेन्स फिजिकमध्ये संदीप सावळे, ओमकार पाडळकर, सुशांत जाधव आणि नीलेश गुरव या चौघांनी आठपैकी चार गटांत अव्वल यश मिळवले. महिलांच्या फिजिक स्पोर्ट्स प्रकारात रेखा शिंदेने आणखी एका किताबाची नोंद केली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत दिल्लीची ज्योती पाल विजेती ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळय़ाप्रसंगी राष्ट्रीय महासंघाचे सरचिटणीस संजय मोरे, आयोजक संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे गोरक्षनाथ गाडीलकर, राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर, राजेश सावंत आणि विशाल परब उपस्थित होते.