विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेला शिक्षण विभागाचे प्राधान्य; साताऱ्यातील 594 प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही

विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 622 पैकी 594 माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे या सुरक्षिततेत आणखी गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पूर्वीपासूनच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सर्व शाळांशी पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 622 शाळांमध्ये 594 शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सातारा 3, खटाव 2, माण 6, पाटण 3, वाई 8, जावली 5, महाबळेश्वर 1 अशा 28 शाळांनी अद्यापि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. संबंधित शाळांनाही तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत सर्व शाळांना कडक सूचना देण्यात आल्या असून, या सूचनांचे पालन न करणाऱ्या शाळांकर कारवाई करण्यात येणार आहे. शाळास्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मुलांचे व मुलींचे स्कच्छतागृह स्वतंत्र असावे. मध्यभागी दुभाजक असावा. शाळेत अनुचित प्रकार घडल्यास 24 तासांच्या आत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना कळवण्यात यावे. राज्य बालहक्क आयोगाने तयार केलेल्या ‘चिराग ऍप’ची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन 1098चा फलक शाळेच्या दर्शनी भागावर लावावा, आदी सूचना शाळांना देण्यात आल्याचे कोळेकर यांनी सांगितले.

विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी लावण्यात आल्या आहेत. शाळेतील महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी यांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर व विद्यार्थिनींवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात येत आहेत. विकोप वातावरणनिर्मितीसाठी शाळास्तरावर ‘सखी सावित्री’ समितीचे गठन करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होऊन फेरतपासणी पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे, असे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.