सचिन तेंडुलकर संघाला जेतेपद; आरुष कोल्हेची नाबाद द्विशतकी खेळी

मुंबईचा 14 वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱया निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. गुरुवारी शतकावर नाबाद असलेल्या आरुष कोल्हेने आज नाबाद द्विशतक साकारले. त्याने 292 चेंडूंत 37 चौकारांसह नाबाद 208 धावा केल्या. दर्शन राठोडच्या साथीने त्याने आठव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केल्याने वेंगसरकर संघाने 8 बाद 379 या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. या स्पर्धेत  अंतिम साखळी लढतीपूर्वी सर्वाधिक सहा गुण असणाऱया तेंडुलकर संघाने मग खेळ संपेपर्यंत 66 षटकांत 5 बाद 160 धावांपर्यंत मजल मारल्याने पहिला डाव अपूर्ण राहिल्याने उभय संघाना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला आणि 7 गुणांसह तेंडुलकर संघाला विजेतेपद मिळाले.

कर्नाटक स्पोर्टिंग येथील दुसऱया लढतीत काळ रवी शास्त्राr संघाला 209 धावांत गुंडाळणाऱया गावसकर संघाने 101 षटके फलंदाजी करीत सर्वबाद 332 धावा करून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण वसूल करीत संपली गुणसंख्या 6 वर नेली. त्यांच्या अगस्त्य काशीकर  (104) याने आज शतकी खेळी केली, तर धैर्य पाटील (47), हर्षित बोबडे (46) यांनीदेखील आपला खारीचा वाटा उचलला.

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आरुष कोल्हेला (413 धावा) गौरविण्यात आले, तर हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी त्याला क्रिकेट बॅट देत त्याचा विशेष गौरव केला. सर्वोत्तम गोलंदाज म्हमून मोक्ष निकम (11 बळी) याची निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आरुष कोल्हे याचीच निवड करण्यात आली.