सचिन तेंडुलकरच्या सरावाचे सोशल मीडियावर वादळ

क्रिकेटचा देव अर्थात विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा ‘याचि देही याचि डोळा’ मैदानावर खेळताना बघण्याचे भाग्य त्याच्या चाहत्यांना लाभणार आहे. सचिन सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेसाठी जोरदार तयारीला लागलाय. त्याने स्वतः सोशल मीडियावर आपल्या सरावाचा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट झालाय.

मुंबईमध्ये येत्या 22 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक स्टार खेळाडू सहभागी होणार असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणीच ठरणार आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर इंडिया मास्टर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

या संघात सुरेश रैना, युवराज सिंग, इरफान पठाणसारखे स्टार खेळाडू खेळणार आहेत. सचिनने सरावादरम्यान अचूक स्ट्रेट ड्राईव्ह, नजाकतभरे कव्हर ड्राईव्ह व अफलातून पूल व स्वीपचे फटके मारले. सचिनने पोस्ट केलेल्या सरावाच्या व्हिडीओवर अर्थातच प्रतिक्रियांचा पाऊस पडला असून हा व्हिडीओ जबरदस्त हिट होतोय.