Share market : सचिन तेंडुलकरचा फेव्हरेट शेअर बनला रॉकेट, 5 कोटी गुंतवणुकीचे झाले 72 कोटी!

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर बिझनेसच्या पिचवरही चौकार-षटकार ठोकत आहे. त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली असून याला शेअर बाजारही अपवाद नाही. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्तोमोत्तम शेअर्स आहेत. मात्र सचिनची फेव्हरेट कंपनी आझाद इंजिनिअरिंग ली. (Azad Engineering ltd) असून यात त्याने कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. यामुळे त्याला प्रचंड फायदाही झाला आहे. बुधवारी शेअर बाजारात उलथापालथ होत असतानाही या कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागले आणि तो ऑल टाइम हायवर पोहोचला.

आझाद इंजिनिअरिंग ही एक स्मॉल कॅप कंपनी असून गेल्या काही काळापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. बुधवारीही शेअर बाजारात उलथापालथ होत असताना आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरला अपर सर्किट लागले. हा शेअर 5 टक्के वाढीसह 1981.80 रुपयांवर पोहोचला. आझाद इंजिनिअरिंगचा हा ऑल टाइम हाय असून गेल्या तीन दिवसांपासून या शेअरला अपर सर्किट लागलेले आहे.

शेअरमध्ये तेजी आल्याने गुंतवणूकदारांनाही चांगला फायदा होत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये हा शेअर 14 टक्के वाढला असून एक महिन्यात तब्बल 28 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांचा विचार केल्या या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांना 192.52 टक्के एवढा परतावा मिळाला आहे. तेजीमुळे या कंपनीचे भागभांडवल 11 हजार 720 कोटी झाले आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही या कंपनीमध्ये गुंतवणूक करून पैसा छापला आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, गेल्यावर्षी मार्च महिन्यात सचिनने या कंपनीच्या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याने 3 लाख 65 हजार 176 शेअर्स खरेदी केले होते. सचिनने गुंतवणूक केली तेव्हा शेअरचा भाव 135.92 रुपेय होता. या हिशेबाने पाहिल्यास आता यात 14.56 पट वाढ झाली आहे. याचाच अर्थ सचिनच्या 5 कोटी रुपयांचे 72.37 कोटी रुपये झाले आहे.

विशेष म्हणजे फक्त सचिन तेंडुलकरच नाही तर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, बॅटमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू सारख्या स्टार खेळाडूंनीही यात गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीची स्थापना 1983 मध्ये झाली होती. ही कंपनी एअरोस्पेस कंपोनेंट्स आणि टर्बोइनची निर्मिती करते. एअरोस्पेस, सुरक्षा, ऊर्जा, तेल आणि ओईएम सारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते.

(टीप – ही फक्त माहिती असून आम्ही कोणताही शेअर खरेदी किंवा विक्रीचा सल्ला देत नाही.)