
कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या पुण्यातील पर्यटक संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांच्या परिवाराचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वतीने संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. दोन्ही कुटुंबीयांच्या मुलांना सरकारी नोकरीत घ्यावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले.
जगदाळे, गनबोटे यांच्यावर दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे जवळून गोळ्या मारल्या. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी अतिरेक्यांना हरएक प्रकारे विनवणी केली. तेथे घडलेला दुर्दैवी प्रसंग या वेळी कुटुंबीयांनी आमदार सचिन अहिर आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितला.
या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आपल्या कुटुंबीयांबरोबर असल्याची ग्वाही सचिन अहिर यांनी त्यांना दिली. या कुटुंबांना सरकारने त्यांची उच्चशिक्षित मुले आसावरी जगदाळे व कुणाल गनबोटे यांना शासकीय सेवेत घेण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.
या वेळी राज्य संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, प्रवीण डोंगरे, राम थरकुडे, वैभव दिघे, जगदीश दिघे, अनिल माझिरे, गंगाधर बधे, परेश खांडके, गणेश काकडे, गिरीश गायकवाड, सलमा भाटकर, सविता गोसावी हे उपस्थित होते.