‘सामना’चे जीमेल, यूटय़ुब चॅनेल हॅक, गैरवापर रोखण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार

दैनिक ‘सामना’च्या वेबसाईटचे जीमेल अकाऊंट तसेच यूटय़ुब चॅनेल हॅक करण्यात आले आहे. यानंतर सामनाची वेबसाईट देखील हॅक होण्याची शक्यता असून त्यावरून हॅकर चुकीच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ किंवा अफवा पसरविण्याचे प्रयत्न करू शकतात. हे लक्षात घेत दैनिक सामनाकडून सर्व वाचकांना विनंती करण्यात येत आहे की, [email protected], युटय़ुब चॅनेल @saamanaonline तसेच सामनाची वेबसाईट saamana.com यावरून एखादी चुकीची बातमी, अफवा, चुकीचे फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.

दैनिक ‘सामना’ सायबर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्याची पावले उचलत असून एक जबाबदार तसेच लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून आणि निवडणुकीचा काळ लक्षात घेता कोणतीही दुर्घटना होऊ नये किंवा चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणूनच दक्षतेसाठी आम्ही हे वृत्त प्रसिद्ध करत आहोत.

‘सामना’चे अकाऊंट हॅक करणाऱ्या व्यक्तींवर लवकरच कडक कारवाई व्हावी यासाठी सामना प्रयत्नशील आहे. वाचकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा दैनिक सामना व्यक्त करत आहे.