
वक्फ विधेयकाने भारतात धार्मिक ध्रुवीकरण झाले. त्यामुळे भाजप खूश झाला असेल. भाजपचे हिंदुत्व हे देशाचे विभाजन करणारे आहे. धीरेंद्र शास्त्रींसारखे बाबा लोक अशा हिंदुत्वाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. त्यांना हिंदूंची स्वतंत्र गावे निर्माण करायची आहेत. हिंदू संस्कृतीला जगात शरमेने मान खाली घालायला लावणारे हे विचार आहेत. ही बाबागिरी कुठपर्यंत जाणार?
वक्फ विधेयक मंजूर झाल्यावर प. बंगालात दंगल उसळली. बिहारात मुसलमान रस्त्यावर उतरले. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या मनाप्रमाणे घडत आहे. या बिलावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत साधारण 20 तास चर्चा झाली. पण ‘मणिपूर’च्या स्थितीवर दोन्ही सभागृहांत मिळून एक तासही चर्चा होऊ शकली नाही. वक्फ बिलामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भाजप खूश असेल. मणिपूरवर सविस्तर चर्चा झाली असती तर सरकारचे वाभाडे निघाले असते. त्यामुळे धार्मिक विषयात सगळ्यांनाच गुंतवून ठेवले गेले. भारतातील हिंदू-मुसलमान तेढ वाढावी व त्याचे रूपांतर दंगलीत व्हावे यासाठी भाजप इमानदारीने प्रयत्न करीत आहे. 6 एप्रिल रोजी मुंबईत रामनवमीच्या शोभायात्रा निघाल्या. यात्रांचे स्वरूप नेहमीप्रमाणे धार्मिक नव्हते. तर यावेळी काही ठिकाणी ते विकृत आणि हिडीस होते. मुंबईच्या रस्त्यांवर या यात्रांनी गोंधळ केला व जमाव मुसलमानांच्या विरोधात आरोळ्या ठोकीत होता. ही कसली रामभक्ती? भारतीय घटनेच्या हे विरोधात आहे. भारतीय घटनेच्या 29 व्या कलमानुसार धर्म हा प्रत्येकाने आपल्या पारलौकिक व आध्यात्मिक विषयापुरता मर्यादित ठेवला पाहिजे आणि इहलौकिक विषय राज्यांकडे सोपविले पाहिजेत. देव आणि धर्म हे व्यक्तीपुरते असायला हवेत. त्यासाठी लागणारे आवश्यक स्वातंत्र्य भारतीय घटना देते. ‘राष्ट्रवाद’ म्हणून कोणत्याही धर्माला भारतीय घटना मान्यता देत नाही. पण भारतीय घटनेचे संदर्भ देणाऱ्यांना हिंदूद्रोही आणि राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे.
नक्की काय जिंकले?
भारतीय जनता पक्षाने राजकारणात व निवडणुकांत धर्म आणला. भाजपला भारतात जे `हिंदू पाकिस्तान’ निर्माण करायचे आहे, त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर धीरेंद्र शास्त्रींसारखे ‘बाबा’ लोक आहेत. हिंदूंची स्वतंत्र गावे वसवावीत व त्यात मुसलमान आणि इतर धर्मीयांना स्थान नाही, असेही हे बाबा सांगतात. त्याच धीरेंद्र शास्त्रींच्या दर्शनाला देशाचे पंतप्रधान जातात. या बाबांचा उल्लेख ते ‘छोटे भाई’ असे करतात. म्हणजे ‘बाबा’ बोलतात त्यास पंतप्रधानांची मान्यता आहे व असे बाबा हेच भाजपच्या हिंदुत्वाचे आदर्श आहेत. द्वेष आणि विभाजनाच्या विचारात हिंदुत्व कसे वाढेल? त्यातून देश टिकेल काय? ‘वक्फ’सारखे विधेयक आणून द्वेष आणि विभाजनाच्या विचारांत सत्ताधाऱ्यांनी जास्तच विष मिसळून ठेवले आहे. हे विधेयक मंजूर झाल्याने भाजपने जणू पाकिस्तानवरच विजय मिळवल्याचा आविर्भाव आणला. भाजपचे लोक रस्त्यावर येऊन नाचू लागले. प्रश्न धर्माचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा नसून देशाच्या एकतेचा आहे, हा विचारच आता नष्ट झाला आहे. भाजपने ‘नफरत’ म्हणजे विद्वेष पेरण्यासाठी वक्फचे विधेयक आणले. त्या विद्वेषाच्या बाजूने कोणी मतदान केले, तर बिहारचे नितीश कुमार, चिराग पासवान, जतीनराम मांझी, आंध्रचे चंद्राबाबू, जयंत चौधरी यांनी. पंतप्रधान मोदी यांनी ओडिशातील बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांना फोन केला व राज्यसभेची त्यांच्या पक्षाची सात मते वक्फ विधेयकाच्या बाजूने वळवली. तरीही राज्यसभेत 128 विरोधी 95 मते मिळवली. लोकसभेत 288 आणि 232 असे हे अंतर आहे. हे विधेयक मंजूर करून घेणे भाजपास सोपे नव्हते. 273 चे बहुमत आहे व भाजपास 288 मते मिळाली याचा अर्थ काय? एखाद्या आर्थिक, सामान्य माणसाच्या जीवनासंदर्भात मतदान झाले असते तर भाजपला बहुमताचा आकडा गाठणे सोपे नव्हते.
मुसलमान मतांसाठी…
मुसलमान मतांचा एक तुकडा भाजप आपल्या बाजूने वळवू इच्छित आहे. मुसलमानांची 25 टक्के मते भाजपकडे वळवण्यात यश आले तर विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला कोणत्याही प्रादेशिक पक्षांची गरज भासणार नाही. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, जयंत चौधरी यांच्या पक्षांना मुसलमानांची मते मिळत होती. वक्फ बोर्डाच्या बिलास पाठिंबा दिल्यामुळे या सगळ्यांना एकगठ्ठा मुसलमान मते मिळणार नाहीत. याचा फटका त्या प्रादेशिक पक्षांना बसेल. भाजप याचा फायदा त्या त्या राज्यात घेईल. गरीब मुसलमानांची ‘बाजू’ वक्फ बिलाच्या निमित्ताने भाजपने घेतली ती त्यासाठीच. यामुळे भाजपबरोबर असलेल्या प्रादेशिक पक्षांना त्रास होईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या राजकारणाचा अंत होईल. बिहारमध्ये भाजपला त्यांचा पहिला मुख्यमंत्री बनवायचा आहे. नितीश कुमार यांचा काटा भाजपने जवळ जवळ काढला. पिछडे, अति पिछडे व मुसलमान मतांच्या बेरजेने बिहारात नितीश कुमार टिकले तो पायाच भाजपच्या विखारी मुसलमान द्वेषाने नष्ट झाला. बिहारमधून नितीश जातील आणि प. बंगालात ममता कायम राहतील हे आजचे चित्र वक्फ बिलाने स्पष्ट केले. प. बंगालात कितीही दंगे घडवले तरी हिंदू मतदार ममता बॅनर्जी यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे व आता ‘वक्फ’ प्रकरणानंतर मुसलमान एकगठ्ठा ममतांबरोबर राहील हे उघड आहे. भाजपला द्वेष पेरायचा आहे व त्यातून द्वेषच निर्माण करायचा आहे. प्रत्येक राज्याचे गणित वेगळे आहे. वक्फमुळे ‘शाहबानो’सारखी स्थिती निर्माण होईल व देशभरात अराजक उभे राहील हे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तरीही द्वेषात तेल ओतले गेले हे पक्के. रामनवमीच्या शोभायात्रांत मुसलमानांच्या नावाने गोंधळ घालूनही मुसलमानांनी प्रतिकार केला नाही. भारताला सहजीवनाशिवाय पर्याय नाही हे हिंदू, मुसलमानांसह सगळ्याच धर्मबांधवांनी लक्षात घ्यायला हवे! नाहीतर भाजपला जो संहार हवा आहे त्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल.
त्यांचे वेगळे राष्ट्र
धीरेंद्र शास्त्रींसारखे भाजपचे प्रचारक हिंदूंसाठी स्वतंत्र गावांची भूमिका मांडतात. त्यात धार्मिक सहजीवनाला स्थान नाही. मग देशातील 20 कोटी मुसलमानांचे हिंदुस्थानातच स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा मूर्खपणा हे बाबा लोक करणार का? यांचे हिंदुत्व भारत तोडणारे आहे. गेल्या सवाशे वर्षांत जगाची अर्धी लोकसंख्या दीडशे कोटी ही केवळ धर्म, वंश, वर्णाच्या नावाखाली मारली गेली. हिटलरने 1933 ते 1945 या बारा वर्षांत 60 लाख ज्यू मारले म्हणून इस्रायल राष्ट्र निर्माण झाले आणि पालेस्टाईन हे प्रस्थापित राष्ट्र उद्ध्वस्त करून ज्यूंचे जेरुसलेम निर्माण केले गेले. आज इस्रायलने उरलेले पॅलेस्टाईनही निर्घृणपणे संपवले व लाखो अरब आणि मुसलमान मारले. धर्माच्या नावावर हा संहार झाला. भारतातही हा संहार काही लोकांना हवाच आहे. त्याशिवाय त्यांचे राजकारण यशस्वी होणार नाही. भारतात एकेकाळी राष्ट्रीय प्रवाह होता. आज तो गढूळ झाला. भारताच्या संसदेत वक्फ बिलाच्या मंजुरीवर गदारोळ सुरू होता तेव्हा बाजूच्या चीनने पाच नवे उपग्रह अवकाशात सोडले. त्याच रात्री उडणाऱ्या टाक्सीला मंजुरी देऊन विकास आणि तंत्रज्ञानात नवा इतिहास रचला. भारतातील बाबा मंडळींना हिंदूंची गावे वसवायची आहेत.
भारतातील बाबागिरी कुठपर्यंत जाणार?
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]