
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झालं. वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. काही लोकांनी तसा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. तो निरर्थक आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नसते निरर्थक उद्योग असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर केले. संघाची पुढची पावले महत्त्वाची वाटतात. काशी, मथुरा आणि दिल्ली असे त्यांचे लक्ष्य दिसते!
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झालं. या विधेयकास जे पाठिंबा देणार नाहीत ते कसले हिंदुत्ववादी, असा चिमटा श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काढला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्यांचा रोख होता. वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध काय? मुसलमानांच्या संपत्तीवर सरकारी नियंत्रण आणण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक आणले. हे सरळ प्रॉपर्टी वॉर आहे. यात हिंदू-मुसलमानांचा प्रश्न कसला? वक्फ बोर्डाकडे साधारण सव्वादोन लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात मोक्याच्या जमिनी आहेत. 2010 मध्ये लालू यादव म्हणाले होते, वक्फ बोर्ड सरकारी जमिनींचा कब्जा घेत आहे. वक्फच्या विरोधात कठोर कायदा बनवायला हवा. तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. आता मोदी-शहांचे आहे. या सरकारने हे बिल आणून नेहमीप्रमाणे हिंदू-मुसलमान असा खेळ केला. प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांचा वाद पेटवायचा व आपले काम साधून घ्यायचे. वक्फच्या माध्यमातून तेव्हा जमिनी हडपणारे दुसरेच लोक आहेत व आता वेगळे लोक आहेत. भाजपाने हे विधेयक वक्फची अफाट संपत्ती डोळ्यासमोर ठेवून आणले. सामाजिक सुधारणा, जनसेवा, गरीब मुसलमानांचे हित वगैरे झूठ आहे!
हिंदुत्वाचा बाजार
भाजपा व त्यांचे लोक हिंदुत्वाचा बाजार मांडून बसले आहेत. त्या बाजारात औरंगजेबापासून, अफजल खानापर्यंत सगळे आहे. राम मंदिर, हिंदुत्व यावर जहरी टीका करणारे नितीश कुमार, पासवान ही मंडळी त्या बाजारात आहेत. भाजपाचा हिंदुत्ववादी झेंडा आज ते फडकवत आहेत. त्यांचे ढोंग अनेकदा उघडे पडले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अधिक पारदर्शक व परखड वाटते. भाजपातील बाटग्यांनी औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्यासाठी स्वत:ची छाती पिटून घेतली. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढल्याशिवाय हिंदुत्व तेजाने झळकणार नाही असे ज्यांना वाटते त्यांचे डोके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठिकाणावर आणले. संघाच्या माजी सर कार्यवाहंनी सांगितले की, ‘औरंगजेबाची कबर खोदण्याची गरज काय? हे हिंदुत्व नाही. औरंगजेब महाराष्ट्रात मेला म्हणून त्याची कबर महाराष्ट्रात आहे. औरंगजेबाची कबर हा काही संघाचा अजेंडा नाही.’ या भूमिकेमुळे स्वत: देवेंद्र फडणवीस उघडे पडले. त्यांनी आपल्या मंत्र्यांना वेळीच रोखायला हवे होते. फडणवीस माणसे वापरून घेतात व सोडून देतात. याचा अनुभव अनेकांना येत आहे. हिंदुत्वाच्या विषयावर गोंधळाचे चित्र निर्माण झाले. अशोक सिंघल यांच्यानंतर विश्व हिंदू परिषद दिशाहीन झाली व अयोध्येत राम मंदिर उभे राहिल्याने जणू विश्व हिंदू परिषदेकडे काम उरले नाही. बजरंग दलाची अवस्था शिंदे गटासारखी झाली. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाबतीत दिशादर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकांकडेच पाहावे लागेल. भाजपाचे हिंदुत्व उठवळ आणि व्यापारी पद्धतीचे आहे व ते वरवरचे आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी हिंदुत्वाचा कार्यक्रम जाहीर केला, पण वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकावर ते बोलले नाहीत. पण होसबाळे यांनी जे विचार मांडले ते महत्त्वाचे. होसबाळे म्हणाले, ‘धर्मांतरण, गोहत्या, लव जिहाद या आव्हानांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अयोध्या आंदोलनाच्या वेळी विश्व हिंदू परिषद आणि आमच्या धर्मगुरूंनी तीन मंदिरांवर भाष्य केले होते. वाराणसीत विश्वनाथ मंदिर आणि मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी. स्वयंसेवकांनी या मंदिरांसंदर्भात काही प्रयत्न व कार्य सुरू केले तर त्यांना संघ थांबवणार नाही. मुस्लिम आक्रमकांनी मथुरेत श्रीकृष्ण मंदिर आणि वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला केला. ते उद्ध्वस्त केले व त्यावर मशीद बांधली. होसबाळे यांनी कोणतीही लपवाछपवी न करता ही भूमिका मांडली. ती अत्यंत संयमी आहे, पण पुढे जाऊन होसबाळे यांनी सांगितले ते महत्त्वाचे. “आता मशिदी खोदून मंदिरे शोधण्याचे उद्योग सुरू आहेत. ते निरर्थक आहेत. भूतकाळातले खड्डे उकरून काय मिळणार?’ मशिदीच्या खोदकामामुळे समाजात शत्रुत्व निर्माण होईल आणि महत्त्वाची सामाजिक परिवर्तनाची कामे त्या खड्ड्यात जातील. मुख्य म्हणजे, तुम्ही किती मशिदी आणि पुरातन इमारतींचे खोदकाम करणार? 30 हजार मशिदी आहेत. त्या खोदणार? इतिहास बदलण्याचा हा प्रयोग का करायचा? इतिहास किती मागे घेऊन जाणार? समाजातले शत्रुत्व आणि आक्रोश वाढत गेले तर महत्त्वाच्या कार्यावरचे लक्ष विचलित होईल. भूतकाळात अडकून चालणार नाही.” श्री. होसबाळे यांनी मांडलेल्या भूमिकांचे भारतीय जनता पक्षातील बाटग्यांनी चिंतन केले पाहिजे. खरे तर संघाने या सर्व बाटग्यांचे एक चिंतन शिबीर घेतले पाहिजे, तरच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हातात हात घालून पुढे जातील.
स्पष्ट भूमिका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेणे स्वाभाविक आहे. संघ स्वयंसेवकांच्या फौजा मैदानात उतरतात म्हणून भाजप निवडणुकीत विजयी होतो. पैशांचा मारा हा मोगल आक्रमणासारखा आहे. संघाने हे मोगली आक्रमण रोखून भाजपाचे शुद्धीकरण केले पाहिजे व त्याची सुरुवात त्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर केली असे दिसते. पंतप्रधान मोदी हे गुढीपाडव्याला नागपुरात पोहोचले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले. त्यांनी मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही व भविष्यातील राजकीय घडामोडींचे ते दिशादर्शक आहे. मोदी यांच्या उधळलेल्या अश्वाचा लगाम ओढण्याचे काम संघाने केले. मोदी इतके शक्तिमान झाले आहेत की, त्यांच्याशी भांडण करण्याचे बळ संघात नाही असे सांगितले जाते ते चूक आहे. संघाला ईडी, सीबीआय, पोलिसांची भीती नाही. त्यामुळे संघ ही अफाट संस्था मोदींना घाबरणार नाही. वाद न करता शांतपणे रक्तहीन बदल घडवण्याचे सामर्थ्य संघात आहे व त्याचे दर्शन अनेकदा घडले.
मोदी संघ मुख्यालयात गेले.
संघ पुढचे पाऊल टाकत आहे.
काशी, मथुरा आणि दिल्ली!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]