रोखठोक – महाराष्ट्राचे दिल्लीतील धिंडवडे, सगळेच मोगलांना मिळत आहेत

दिल्लीत मराठी साहित्य संमेलन व महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस साजरा झाला, पण मराठी माणसाचा स्वाभिमान, बाणा या सगळ्यात हरवून गेला. महाराष्ट्राची सूत्रे पूर्णपणे दिल्लीच्या हातात आणि अमित शहांच्या भेटीसाठी महाराष्ट्राचे नेते पहाटे चार वाजेपर्यंत ताटकळत उभे आहेत. शिंदे-शहांत त्या ‘पहाटे’ काय घडले?

इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत असते याची प्रचीती देणारा काळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. मराठ्यांतील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेले ही स्थिती पाहून व्यथित मनाने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करतो. 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा झाला. तेथेही या दुहीचे दर्शन झाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील कटुतेचे दर्शन किल्ले शिवनेरीवर झाले व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्याची मजा घेत राहिले. छत्रपती संभाजी यांच्यावरील ‘छावा’ चित्रपट सध्या सुरू आहे. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांनी ‘छावा’ चित्रपटाचा विशेष उल्लेख केला तो मोगलांनी संभाजीराजांना कसे मारले ते पहा व भाजपला मते द्या, असे अप्रत्यक्ष सांगण्यासाठी. संभाजीराजांना पकडून देणारे व स्वराज्याची वाताहत करणारे फितूर आपलेच होते व त्यांना दिल्लीचा वरदहस्त होता हे स्वीकारले तर आज महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा तेच दुर्भाग्य आले आहे. महाराष्ट्र मनाने जातीपातीत दुभंगला आहे व त्याचा फायदा दिल्ली घेत आहे. स्वाभिमानासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आज राजकारणाच्या मोहमायेमुळे शरणागत झालेले स्पष्ट दिसते.

प्रतिष्ठेवर घाव

महाराष्ट्रातील संपत्ती आणि उद्योग गुजरातमध्ये जात आहेत हे आता नित्याचेच झाले. ‘पेटंट’चे मुख्यालय मुंबईत होते. आठ दिवसांपूर्वी बातमी आली, हे ‘पेटंट’चे कार्यालयही आता दिल्लीत हलवले. एकदम अहमदाबादला नेले तर बोंब होईल म्हणून आधी दिल्लीत व नंतर अहमदाबादला नेले जाईल. बेळगावात मराठी लोकांवर नव्याने हल्ले सुरू आहेत व फडणवीस, शिंदे, पवार हे त्रिकूट त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे मराठी भाषा दिन व पुरस्कार वितरण वगैरे सोहळे व्यर्थ आहेत. मंत्रालयातील कारभार पूर्णपणे मराठीतच चालावा असे नवे फर्मान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा काढले. त्याने काय होणार? ठाणे महापालिकेतील मराठी भाषेत पदवी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचे फर्मान एकनाथ शिंदे यांनी सोडले आहे. पारतंत्र्याच्या काळात राज्यभाषा नसतानाही मराठी भाषेबद्दलचे प्रेम येथील रहिवाशांच्या मनात काठोकाठ भरलेले होते. स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात स्वभाषेच्या सर्वांगीण वाढीला विपुल वाव असतो, पण संघर्षाच्या काळात तिच्याबद्दलचे प्रेम आणि अभिमान कडवा होत असतो हे चित्र आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आणि शिवसेनेच्या निर्मितीच्या वेळी पाहिले. मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळणार नाही ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती व त्यांनी ते कार्य केले, पण आज मराठी माणसाला प्रतिष्ठाच राहिलेली नाही. मराठी माणसाच्या प्रतिष्ठेसाठी निर्माण झालेल्या शिवसेनेवरच दिल्लीने घाव घातला. शिर्के फक्त संभाजीराजांच्या काळातच नव्हते, आजही आहेत, तर सरदेसायांच्या वाड्यातील अनाजीपंत व फितुरी करणारे सरकारकून आजही महाराष्ट्रात आहेत आणि राजकीय वतनदाऱ्यांसाठी दिल्लीचे पाय चाटत आहेत. हे चित्र महाराष्ट्रासाठी बरे नाही!

वतनाच्या लढाया; शिंदे-शहा संवाद

वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेइमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनांसाठी बेइमान दिल्लीत मुजरा झाडतात. उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला ‘मराठा’ जागा झाला. स्वाभिमानासाठी ‘उठाव’ केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले. एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ‘वेस्टइन’ हॉटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता. “सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत”, असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले. “बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा” हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढय़ा भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत. शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता. त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे. या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच.

अमित शहा – क्या शिंदेजी, सुबह के चार बज रहे है, इतना क्या अर्जंट है?
शिंदे – आपको सब मालूम है, यहा क्या हो रहा है.
शहा – क्या हो रहा है?
शिंदे – माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत.
शहा – ऐसा कैसा हो सकता है? मै देवेंद्र से बात करता हूं.
शिंदे – मुझे दबाने की, खतम करने की पुरी कोशिश हो रही है. आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका वादा था, चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहुंगा.
शहा – हमारे 125 लोग चुनकर आये… तो आप कैसा क्लेम कर सकते हो?
शिंदे – मेरे नेतृत्व में चुनाव हुवा.
शहा – नहीं, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुवा. आप को क्या चाहिये बोलो… मै कोशिश करूंगा.
शिंदे – मुख्यमंत्री.
शहा – देखो भाई, वो ठीक नही है. अभी नही हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.
शिंदे – मै क्या करूं?
शहा – आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नही बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है।
शिंदे – फिर हमारे पार्टी का क्या?

यावर “वो हमारे पे छोड दो. वो पार्टी हमनेही बनायी. आप चिंता मत करो.” असे श्री. शहा यांनी सांगितले व ही पहाटेची बैठक संपवली. असे सांगणारे भाजपचेच लोक आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे अशा पद्धतीचे चालले आहे. प्रयागराजचा कुंभ संपला, पण महाराष्ट्राच्या राजकीय कुंभात पक्षांतराची चेंगराचेंगरी सुरूच आहे.

सैरावैरा धावपळ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. त्यामुळे पवारांचा अखेरचा मालुसराही चालला अशा अफवांनी पेट घेतला. रोज कोणीतरी इथून तिथे जातच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सरदार या शाहीकडून त्या शाहीकडे चाकरीसाठी जात होते. वतनदाऱ्या मिळाव्यात हा त्यांचा मुख्य हेतू होता. आज तरी वेगळं काय सुरू आहे? शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची नावे घेऊन राजकारण करायचे. शिवाजी महाराजांच्या काळात आपण जसे वागलो तसे वागता कामा नये असे काही त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या आजच्या मराठा नेत्यांना वाटत नाही. दुही व विश्वासघात यांचे राजकारण त्या काळातही चालले. आजही चालले आहे. पुन्हा सगळे एकाच माळेचे मणी. एकूण महाराष्ट्राची जी अवहेलना गेल्या तीनेक वर्षांत आमच्याच नेत्यांनी केली त्यावर कळस चढविण्याचे उद्योग आता रोजच सुरू आहेत. त्यांना एकदा सांगावेसे वाटते की, शिवाजी महाराज, संभाजीराजांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा आणि त्यांचे पुतळे उभारण्याचा कसलाही हक्क तुम्हाला नाही. चंद्रराव मोरे, गणोजी शिर्क्याचे राजकारण अजून चालू आहे. दिल्लीच्या ज्या औरंगजेबाच्या दरबारात मान वाकवायची नाही या केवळ एका स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्याच दिल्लीपुढे महाराष्ट्र पहाटे चार वाजेपर्यंत ताटकळत उभा राहतो व झुकतो, याचे पाणी दिल्लीने जोखले. व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची चटक यांनी झपाटलेले कार्यकर्ते आणि नेते, सत्तेशिवाय जणू देशसेवाच शक्य नाही अशा तिरमिरीत सगळेच सैरावैरा धावत सुटले आहेत व ते प्रामुख्याने एकाच पक्षाच्या तंबूत शिरत आहेत. मोगलांना सर्व मराठे सामील होण्याचाच हा प्रकार आहे. महाराष्ट्रासाठी व मराठी माणसांसाठी स्थापन केलेली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहांनी फोडली. ती शिंदेंच्या हातावर ठेवली. आज शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचे म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघाले. महाराष्ट्राच्या अब्रूचे सध्याच्या दिल्लीश्वरांनी काढलेले यापेक्षा मोठे धिंडवडे कोणते असू शकतात!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]