
औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली काय? नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाटगे खतपाणी घालत आहेत. हा धोका महाराष्ट्राला आहे!
चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून महाराष्ट्रात दंगल उसळली. दंगलीचा केंद्रबिंदू नागपूर आहे हे विशेष. राज्यकर्तेच दंगली घडवतात हे खरे, पण त्या राज्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात, आसपास दंगल नको असते. त्यामुळे नागपूरच्या दंगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सर्व घडले. त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली काय? हा प्रश्न आहे. नागपूरच्या दंगलीने गृहखात्याचा डोलारा पोकळ पायावर उभा आहे हे दिसले व बीड, परभणीपासून नागपूरपर्यंत याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये 3 नोव्हेंबर 1618 ला औरंगजेबाचा जन्म झाला. तो दिल्लीत गेला व दिल्लीतून महाराष्ट्र काबीज करायला निघाला आणि महाराष्ट्रातच कबरीत गेला. औरंगजेबाच्या अनेक बेगमा होत्या, पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. तीसुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे व त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडायची आहे. याच समर्थकांनी गांधी हत्यारा गोडसेचा गौरव केला व त्यांना हिटलरही प्रिय आहे. महाराष्ट्रात हे असे विष पसरवून नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे आहे.
बाबर संपला, आता…
हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली. पाकिस्तानमुळेही दंगे पेटत नाहीत. त्यामुळे कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली. महाराष्ट्रातील एक आमदार अबू आझमी म्हणाले, “औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर सत्तेची होती. त्याने अनेक हिंदू मंदिरे बनवली.” आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. मुसलमानांना आजही बाबर, औरंगजेब वगैरे त्यांचे शासक वाटतात व त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात. हे सध्याच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या पथ्यावर पडते व ते चेकाळतात. इस्लामी दरबारी मोहम्मद साकी मुस्तैद खानने मासीर-ए-आलमगिरी (1731) मध्ये लिहिले की, औरंगजेबाने फर्मान जारी करून काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून तेथे मशिदीचे निर्माण केले. इतर धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा आदेश दिला. मथुरेतील केशवराय मंदिर उद्ध्वस्त केले आणि जोधपुरातील अनेक मंदिरे तोडून त्यांचे अवशेष जामा मशिदीच्या जिन्यांखाली दफन केले. शिखांचे नववे गुरू तेगबहादूरजी आणि इतर शीख धर्मीयांची हत्या त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला म्हणून केली. छत्रपती संभाजीराजांची हत्या त्याने निर्घृण पद्धतीने केली. औरंगजेब हा सत्तापिपासू आणि धर्मांध होताच होता. त्याने आपला बाप शहाजहानला कैद केले. तीन भाऊ दाराशिकोह, शाहशुजा आणि मुरादलाही ठार केले. असा औरंगजेब कोणत्याही धर्मात असला तरी तो कोणत्याही सभ्य समाजाचा आदर्श ठरू शकत नाही. मोगल शासक भारतात तलवार घेऊन आले ते येथील संपत्ती लुटण्यासाठी. त्यामागे धार्मिक प्रेरणा नक्कीच होती. 1399 साली भारतावर हल्ला करण्यासाठी तैमूर लंगडा घुसला. त्याने हजारो निरपराधांची कत्तल केली. ‘तुजुक-ए-तैमुरी’मध्ये तैमूर सांगतो, “हिंदुस्थानात घुसण्याचा माझा हेतू साफ आहे. मी येथे पर्यटनासाठी आलो नाही. काफिरांना मारणे, दुसरे काफिरांची दौलत लुटणे. कारण ती मुसलमानांसाठी आईच्या दुधाइतकीच प्रिय आहे.” हे असे असताना देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवते व आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात.
काशीतली मंदिरे
वाराणसी म्हणजे काशीत औरंगजेबाने मंदिरे तोडली. आता ‘अमृत काला’त वाराणसीत कॉरिडोर बनविण्यासाठी शेकडो मंदिरे आणि पुरातन मूर्तींवर बुलडोझर फिरवले. त्या उद्ध्वस्त मूर्तींचे पुढे काय झाले? कोणीच सांगू शकले नाही. मोदी यांच्या काळात हे मूर्तिभंजन घडले. औरंगजेब क्रूर होताच, पण नंतरचे ब्रिटिश शासनकर्तेही क्रूरच होते व त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना, भारतीय क्रांतिकारकांना निर्दयपणे मारले. जालियनवाला बागेत निःशस्त्र लोकांवर गोळीबार करणारा जनरल डायर हा ब्रिटिश शासक होता व आज आपले ब्रिटिशांशी उत्तम संबंध आहेत. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
औरंगाबादची कथा
मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करून मोठ्या जय्यत तयारीने औरंगजेब दक्षिणेत आला व औरंगाबादेस तळ ठोकून बसला. औरंगाबादबद्दल या बादशहाला काही खास आकर्षण असावे. या गावाचे मूळ नाव खिर्की. 1604 मध्ये आबिसिनियन गुलाम म्हणून आलेल्या मालिक अंबरने ते वसवले. 1626 मध्ये हा चाणाक्ष वजीर मरण पावला तेव्हा त्याच्या मुलाने फत्तेह खानने या गावाचे फत्तेनगर केले, परंतु शहाजहान बादशहाच्या कारकीर्दीतच दख्खनचा सुभेदार म्हणून नेमला गेलेल्या औरंगजेबाने त्याचे औरंगाबाद केले. (1990 सालात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या शहरात आले. त्यांनी औरंगजेबाची कबर खोदा असे सांगितले नाही, तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करून औरंगजेबाचे अस्तित्वच येथे संपवले.) औरंगजेब मेला तेव्हा सम्राट अशोकालाही जितके राज्य लाभले नाही अशा अफाट राज्याचा औरंगजेब मालक झाला होता. परंतु हा डोलारा मराठ्यांनी पोकळ ठरवला व त्याच्या पाठोपाठच तो कोसळला. जेता होण्यासाठी आलेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीतच मिसळून गेला. संभाजीनगरपासून चौदा मैलांवर खुलताबादच्या शीतल परिसरात औरंगजेबाची साधी कबर त्याच्या पराभवाचा इतिहास सांगत विसावली आहे. आपली कबर अगदी साधी असावी, अशी इच्छा मरणापूर्वी औरंगजेबाने प्रकट केली होती. वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर वसलेले हे रोझा खुलताबाद म्हणजे एक थडग्यांचेच गाव. शेख झैनुद्दीन या मुस्लिम संताने जिथे चिरनिद्रा घेतली त्या आवारात औरंगजेबाने आपले थडगे आधीच तयार करून ठेवले होते. शेजारी त्याच्या मुलाचे अझमशहाचेही थडगे आहे, परंतु औरंगजेब बादशहाच्या कबरीवर छप्परही नाही. थडग्याच्या पायऱ्या, बाजूचे जाळीचे कठडे संगमरवरी आहेत, परंतु ही कुंपणे नंतर झाली. इतक्या मोठ्या मोगल बादशहाची ही साधी कबर पाहून लार्ड कर्झनने काही बांधकाम करून घेतले असे म्हणतात.
औरंगजेबाला कोणतेच व्यसन नव्हते. कोणासही गैर बढती त्याने कधी दिली नाही असे यदुनाथ सरकार यांनी म्हटले आहे. ‘आलमगीर जिंदा पीर’ असेच त्याला लोक संबोधित. स्वतः काहीतरी उद्योग केला पाहिजे म्हणून हातांनी तो कापडाच्या टोप्या बनवी. आपल्या मृत्यूनंतर या टोप्यांतून कुराणाच्या प्रती लिहून मिळविलेले पैसे फकिरांना वाटण्यात यावेत असे त्याने लिहून ठेवले होते. त्याच्याबरोबर स्वारीत दौडत येणारी त्याची बेगम रबिया उल दौरानी हिचे स्मारक उभारण्यासाठी ताजमहालाची प्रतिकृती उभारण्याचा त्याने प्रयत्न केला. ‘बीबी का मकबरा’ या नावाने ही सुंदर इमारत आज छत्रपती संभाजीनगरात कुठूनही प्रवेश केला तरी नजरेत येते. दख्खनचा ताजमहाल म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे. आता ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय? औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थडगे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत.
थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]