
आपल्या देशात दोनच ठिकाणी गर्दी उसळते. पहिली बाबा–महाराज–बुवा लोकांसाठी व दुसरी गर्दी उसळते ती क्रिकेटसाठी, जी काल नरीमन पॉइंट, मरीन लाइन्सने अनुभवली. हे फक्त आपल्या भारतातच घडू शकते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघास हरवून वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पॅट कमिन्स ‘ट्रॉफी’ घेऊन ऑस्ट्रेलियाच्या एअरपोर्टवर उतरला. पॅट विमानतळावर उतरला तेव्हा या विश्वविजेत्यास कोणी विचारलेही नाही की, ‘‘काय भावा, कोठून आलास? कसा आहेस? ही ट्रॉफी कसली?’’ कमिन्स त्याचे सामान स्वतःच उचलून घरी गेला व शांत झोपला. भारताचे चित्र वेगळे आहे. विमानतळापासूनच विजेत्या संघाची मिरवणूक सुरू होते. त्या गर्दीत सर्व दुःखे, प्रश्न काही काळ नष्ट होतात. भारत म्हणूनच वेगळा आहे!
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईत अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघ ‘टी-20’ वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परत आला. संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांना आधी दिल्लीत उतरवून पंतप्रधान मोदी यांच्याकडून त्यांचे आगत-स्वागत केले गेले. नंतर विजयी संघ मुंबईत आला. दिल्लीहून संघाचे विमान या वेळी गुजरातला कसे वळवले नाही, याचे अनेकांना आश्चर्यच वाटले असेल; पण संघाच्या मिरवणुकीसाठी एक डबल डेकर बस (उघडी) खास गुजरात येथून मागविण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मुंबईत ‘बेस्ट’च्या डबल डेकर्स उत्तम आहेत व अशा बसमधून याआधी असे उत्सव आणि मिरवणुका साजऱ्या झाल्या आहेत. तरीही बस गुजरातमधून आली हे मजेशीर आहे. नरीमन पॉइंटच्या समुद्राच्या साक्षीने विजयी क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी लाखो लाखोंची गर्दी उसळली होती. गर्दीतल्या लोकांचा आनंद, उत्साह ज्या पद्धतीने ओसंडून वाहत होता तो पाहता देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. ‘टी-20’ वर्ल्ड कप जिंकल्याने भारतातील महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांवर आता उपाय मिळाला आहे, असे समजायचे का? एका बाजूला अथांग पसरलेला अरबी सागर तर त्याच्या काठावर उसळलेला मुंबईकर क्रिकेट रसिकांचा महासागर थक्क करणाराच होता. मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेटवेडी आहे. त्यामुळेच विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभूतपूर्व स्वागतासाठी मुंबईकरांचे पाय हजारोंच्या संख्येने मरीन लाईन्सच्या दिशेने धावले. मात्र या भाऊगर्दीतही आणि जल्लोषाचे वातावरण असूनही मुंबईकरांनी त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि
‘मुंबई स्पिरीट’चे दर्शन
जगाला घडविले. मुंगी शिरायलाही जागा नाही अशी प्रचंड दाटीवाटी असताना मुंबईकरांनी एका रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. अर्थात हे सगळे ठीक असले तरी अनेकांना प्रश्न पडला असेल की, या गर्दीचे नेमके गणित काय? देशावर आणि समाजावर संकटांचा घाला पडतो तेव्हा ही गर्दी कोठे असते? कालच्या मुंबईतील उसळत्या गर्दीतील पंधरा टक्के गर्दी देशाच्या प्रश्नांसाठी जागरुक होऊन रस्त्यावर उतरली तरी जुलमी शासनाला शरण यावे लागेल. मणिपूरच्या बेघर, बेसहारा जनतेला न्याय मिळावा म्हणून मुंबईतील या गर्दीतले शेकडा किती टक्के लोक रस्त्यावर उतरले? दिल्लीच्या जंतर मंतरवर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुवर्णपदक विजेत्या महिला कुस्तीपटू दिवस-रात्र संघर्ष करीत होत्या. त्यांना पोलीस फरफटत नेऊन बाहेर फेकत होते. त्या वेळेस ही गर्दी मुर्दाडासारखी घरातच बसून राहिली. त्यातली पाच टक्के गर्दी रस्त्यावर उतरून महिला कुस्तीपटूंच्या अन्यायावर बोलत राहिली असती तरी त्या महिला खेळाडूंना न्याय मिळाला असता. ‘नीट’ परीक्षेतील घोटाळय़ात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य पणास लागले आहे. त्या पेपर्सची उघडपणे विक्री झाली. विद्यार्थी व पालक सरकारी बेफिकिरीने हवालदिल झाले आहेत, पण देश अजगरासारखा निपचीत पडून आहे. भारतीयांना क्रिकेटचे अतोनात वेड आणि प्रेम आहे. भारतीय क्रिकेटने या विश्वाला अनेक तारे बहाल केले. एकेकाळी सुनील गावसकर, कपिलदेव, गुंडाप्पा विश्वनाथ, दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, बिशन बेदी अशी कितीतरी नावे घेता येतील. अलीकडे सचिन तेंडुलकर हा तर
क्रिकेटचा भगवानच
बनला, पण द्रविड, कोहली, सेहवाग, गांगुली, रोहित शर्मा आदींनीही मैदान गाजवून जी नेत्रदीपक कामगिरी केली त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात भारताचा नावलौकिक झाला, हे खरेच आहे. तथापि क्रिकेटमध्ये जितकी श्रीमंती व पैसा आहे तितका इतर खेळांमध्ये नाही, हेदेखील वास्तवच आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगात सगळय़ात धनवान असल्यामुळेच अमित शहा यांनी त्यांचे पुत्र जय शहा यांना भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्वेसर्वा केले व भारताचा विजयी विश्वचषक जणू जय शहामुळेच मिळाला अशा थाटात हे महाशय कालच्या डबल डेकरवर वावरत होते. क्रिकेट प्रशासनात राजकारण्यांनी आपापली माणसे घुसवून व बसवून तेथील तिजोरीस नागोबाप्रमाणे वेटोळे घालून ठेवले आहे. त्याला क्रिकेटसाठी उसळणारी प्रचंड गर्दी हीच जबाबदार आहे. आपल्या देशात दोनच ठिकाणी गर्दी उसळते. पहिली बाबा-महाराज-बुवा लोकांसाठी व दुसरी गर्दी उसळते ती क्रिकेटसाठी, जी काल नरीमन पॉइंट, मरीन लाइन्सने अनुभवली. हे फक्त आपल्या भारतातच घडू शकते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघास हरवून वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पॅट कमिन्स ‘ट्रॉफी’ घेऊन ऑस्ट्रेलियाच्या एअरपोर्टवर उतरला. पॅट विमानतळावर उतरला तेव्हा या विश्वविजेत्यास कोणी विचारलेही नाही की, ‘‘काय भावा, कोठून आलास? कसा आहेस? ही ट्रॉफी कसली?’’ कमिन्स त्याचे सामान स्वतःच उचलून घरी गेला व शांत झोपला. भारताचे चित्र वेगळे आहे. विमानतळापासूनच विजेत्या संघाची मिरवणूक सुरू होते. त्या गर्दीत सर्व दुःखे, प्रश्न काही काळ नष्ट होतात. भारत म्हणूनच वेगळा आहे!