सामना अग्रलेख – धुमसते बलुचिस्तान!

बलुचिस्तान, तेथील आंदोलने आणि त्याबाबत पाकिस्तानचे धोरण, हा त्या देशाचा प्रश्न आहे. तथापि, तेथील परिस्थिती एवढी का चिघळली, तेथील जनआंदोलने थेट दहशतवादीआत्मघाती हल्ल्यांपर्यंत, अख्खी प्रवासी ट्रेन हायजॅक करेपर्यंत कशी पोहोचली, याचे आत्मपरीक्षण पाक राज्यकर्त्यांनी करायला हवे. बलूच बंडखोरांचे भवितव्य काय, बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी आणखी एकबांगलादेशठरणार का असे अनेक प्रश्न बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांच्याजाफर एक्प्रेसअपहरणामुळे उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील, परंतु तूर्त तरी धुमसते बलुचिस्तान ही पाकिस्तानवरील टांगती तलवार ठरली आहे, हे नक्की!

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी जे घडले त्यामुळे दहशतवादाचे एक नवे आणि भयंकर रूप समोर आले आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एक धावती ट्रेनच प्रवाशांसह ‘हायजॅक’ केली आणि त्यातील 400-500 प्रवाशांना ओलीस ठेवले. त्यात सामान्य जनतेसह पाकिस्तानी सैनिक, पोलीस, दहशतवादविरोधी पथक आणि आयएसआय या पाक गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकार आणि सैन्याला आतापर्यंत दिलेला हा सर्वात मोठा तडाखा म्हणावा लागेल. क्वेटा येथून पेशावर येथे निघालेली जाफर एक्प्रेस दुपारी माशफाक येथील बोगद्यात आल्यावर ‘बीएलए’च्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून ट्रेनवर हल्ला केला आणि संपूर्ण ट्रेनचा ताबा घेतला. त्यातील प्रवाशांना ओलीस ठेवले. पाकिस्तानी लष्कराने आता ओलिसांची सुटका करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. 100 वर ओलिसांची सुटका केल्याचा आणि काही दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे ‘बीएलए’ने आपण काही ओलिसांची मुक्तता केली असून सुमारे तीस पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे, असे म्हटले आहे. ‘ट्रेन हायजॅक’च्या या दहशतवादी नाट्यावर पडदा पडेपर्यंत दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे सुरूच राहतील. परंतु संपूर्ण ट्रेनच हायजॅक करून बलूच दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या

डोक्यात खिळा

हाणला, हे नक्की. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा बलुचिस्तानला त्या देशाने सामील करून घेतले. मात्र तेव्हापासूनच बलुची जनता आणि पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर हा संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांकडून होणारी गळचेपी, विकासाबाबत केली जात असलेली उपेक्षा, प्रांत समृद्ध असूनही बलूच जनतेच्या वाट्याला आलेले गरिबीचे जिणे आणि पाकिस्तानात सामील होण्यास सुरुवातीपासूनच असलेला विरोध या कारणांमुळे स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी तेथे दशकानुदशके चळवळी, आंदोलने सुरू आहेत. त्याने आता दहशतवादी आणि आत्मघाती कारवायांपर्यंत मजल गाठली आहे. त्यात बलुचिस्तानमध्ये चीनकडून उभारले जात असलेले ग्वादर हे बंदर, तेथून चीनपर्यंत जाणारा ‘पाकिस्तान-चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर’ या प्रकल्पांमुळे पाकिस्तानसोबत आपली खनिज संपत्ती चीनदेखील लुटणार अशी बलूच जनतेची भावना झाली आहे. त्यातूनच चिनी सैनिकांवरील हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. ग्वादर आणि पाकिस्तान-चायना इकॉनॉमिक कॉरिडॉर हे दोन्ही प्रकल्प भू-राजकीयदृष्ट्या भारतासाठीदेखील धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारत बलूच बंडखोरांच्या आगीत तेल ओतत आहे, असा आरोप पाकिस्तानी राज्यकर्ते करीत असतात. आताही जाफर एक्प्रेसच्या

अपहरणामागे भारत

असल्याचे तुणतुणे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी वाजवले आहेच. काही दशकांपूर्वी भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे ‘पाकिस्तानचा हात’ असल्याचा आरोप सर्रास केला जात असे. आता बलुचिस्तानमधील बलूच दहशतवाद्यांच्या कारवायांमागे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारताचा हात दिसत असतो. बलुचिस्तान, तेथील आंदोलने आणि त्याबाबत पाकिस्तानचे धोरण, हा त्या देशाचा प्रश्न आहे. तथापि, तेथील परिस्थिती एवढी का चिघळली, तेथील जनआंदोलने आता थेट दहशतवादी-आत्मघाती हल्ल्यांपर्यंत, अख्खी प्रवासी ट्रेन हायजॅक करेपर्यंत कशी पोहोचली, याचे आत्मपरीक्षण पाक राज्यकर्त्यांनी करायला हवे. बलूच बंडखोरांचे भवितव्य काय, पाकिस्तान चीनच्या मदतीने त्यांच्या कारवाया चिरडण्यात यशस्वी होईल का, बलुचिस्तान हा पाकिस्तानसाठी आणखी एक ‘बांगलादेश’ ठरणार का असे अनेक प्रश्न बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांच्या ‘जाफर एक्प्रेस’ अपहरणामुळे उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील, परंतु तूर्त तरी बलुचिस्तानमधील स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि धुमसते बलुचिस्तान ही पाकिस्तानवरील टांगती तलवार ठरली आहे, हे नक्की!